नवी दिल्ली : मोदी सरकार हे शेतकऱ्यांचं नाही, तर उद्योगपतींचं हित पाहणारं सरकार आहे, असं म्हणत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. मोदी सरकारविरोधात आज काँग्रेसनं दिल्लीतल्या रामलीला मैदानावर जनआक्रोश रॅलीचं आयोजन केलं होतं.


काँग्रेसच्या जनआक्रोश रॅलीत काळा पैसा, बेरोजगारी, न्यायपालिका या मुद्यावरुन राहुल गांधी यांनी मोदींबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली. तसंच अनेक महत्वाच्या पदांवर सरकार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत लोकांची नेमणूक करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

मोदी एकामागोमाग एक भाषण करतात. प्रत्येक ठिकाणी कुठला तरी वायदा करतात. पण, प्रत्यक्षात काही होत नाही. असं म्हणत पंतप्रधान मोदींवर राहुल गांधींनी निशाणा साधला.  भारत हा आस्थेचा देश आहे, त्यामुळे जनता फक्त सत्यापुढेच मान झुकवते. देश पंतप्रधानांची भाषणं ऐकतो आणि त्यातील तथ्य शोधण्याचा प्रयत्न करतो.

पंतप्रधान कर्नाटकमधील सभेत भ्रष्टाचाराविरोधात लढण्याचा दावा करतात, मात्र त्याचवेळी त्यांच्या मंचावर जेलमधून परतलेले येडियुरप्पा होते म्हणत पंतप्रधानांचे दावे फोल असतात असा घणाघातही राहुल गांधींनी केला.

पंतप्रधान मोदी गप्प का?

पीएनबी घोटाळ्याचा साक्षीदार नीरव मोदी फरार झाला आहे, मात्र पंतप्रधान त्याबद्दल एक शब्दही बोलत नाहीत अशा शब्दात राहुल गांधींनी नरेंद्र मोंदीवर टीकास्त्र सोडलं आहे.

तसंच रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी मंत्री बनल्यानंतरही आपली कंपनी घोषित केली नाही.

अमित शाहांच्या मुलाने काही महिन्यांमध्ये कोट्यवधींची संपत्ती जमवली,तरीही पंतप्रधान गप्प आहेत. सुप्रीम कोर्टाचे 4 न्यायाधीश न्यायाची मागणी करतात मात्र तरीही पंतप्रधान गप्प आहेत.

दिल्लीतील रॅलीत घेतलेल्या सभेत राहुल गांधींनी पंतप्रधानांच्या मौनालाच लक्ष्य केलं आहे.

चीन भेटीत अजेंडा कुठे आहे?

पंतप्रधान मोदी चीन दौऱ्यावर गेले, मात्र तिथेही अजेंड्याशिवायची चर्चा सुरु आहेत.  डोकलाममध्ये चिनी सैन्य घुसखोरी करत आहे. तिथेही हेलिपॅड बनवत आहे. मात्र डोकलाम मुद्द्यावर पंतप्रधान काही बोलण्यास तयार नाहीत, असं म्हणत मोदींच्या चीन दौऱ्यावरही निशाणा साधला आहे.