Kasganj accident UP लखनऊ: उत्तर प्रदेशातील कासगंज जिल्ह्यात (Kasganj accident) भीषण अपघात झाला आहे. माघी पौर्णिमेनिमित्त गंगास्नानासाठी निघालेल्या भाविकांवर काळाने घाला घातला. ट्रॅक्टर ट्रॉली तलावात पलटी होऊन भीषण दुर्घटना घडली. या मोठ्या दुर्घटनेत 7 मुलांसह तब्बल 15 भाविकांचा मृत्यू झाला. शनिवारी सकाळी हा हादरवून सोडणारा अपघात झाला. ट्रॅक्टरचालकाचं नियंत्रण सुटल्याने, ट्रॅक्टर थेट तलावात जाऊन पलटी झाला. त्यामुळे हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे.
 
माघी पौर्णिमेनिमित्त ट्रॅक्टरमध्ये भरुन सर्व भाविक गंगा स्नानासाठी जात होते. ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत 40 पेक्षा जास्त भाविक बसले होते. भरगच्च ट्रॉली थेट तलावात पलटी झाला. यामध्ये 15 जणांचा मृत्यू झाला तर अनेकजण जखमी आहेत. 


 दरम्यान जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करुन उपचार सुरु करण्यात आले. तर घटनास्थळावरुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. सध्या मदत आणि बचावकार्य सुरु असून, प्रशासनाने या घटनेची गंभीरतेने दखल घेतली आहे.  






 मृतांमध्ये 8 महिला आणि 7 मुलांचा समावेश 


दरम्यान, या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये 8 महिला आणि 7 मुलांचा समावेश  आहे. या भीषण दुर्घटनेने संपूर्ण उत्तर प्रदेशात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. काही भाविकांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. 


मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून शोक व्यक्त


या भीषण दुर्घटनेनंतर  मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून शोक व्यक्त करण्यात आला आहे. तसंच जखमींवर तातडीने उपचार करण्याचे निर्देश दिले आहेत. 


मृतांच्या नातेवाईकांना मदत जाहीर 


या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना सरकारने मदत जाहीर केली आहे. मृतांच्या नातेवाईकांना 2-2 लाख तर जखमींना 50 हजार रुपये भरपाई देण्यात येणार आहे. दरम्यान, या दुर्घटनेमध्ये अजूनही बचावकार्य सुरु असून, तलावाच्या दलदलीत काही भाविक अडकले आहेत का यादृष्टीने तपास सुरु आहे.  हा अपघात नेमका कसा झाला, नेमकी चूक कोणाची, दुर्घटनेला जबाबदार कोण, याबाबत आता चौकशीही करण्यात येत आहे. मात्र त्याआधी मदत आणि बचावकार्याला प्राधान्य देण्याला महत्व आहे. आवश्यकतेनुसार जखमींवर शक्य ते सर्व उपचार केले जात आहेत. 


 अन्य बातम्या


मोठी बातमी : सदाभाऊ खोत लोकसभा लढवण्यासाठी सज्ज, 'या' मतदारसंघातून उमेदवारी मागितली!