Karnataka Viral Video Udupi : कर्नाटकातील उडुपी शहरात दोन गटांमधील टोळीयुद्धाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. उडुपी शहरातील कुंजीबेट्टू रोडवर 18 मे रोजी रात्री मारामारी झाली होती. दोन्ही गटांच्या गाड्या एकमेकांवर आदळल्या गेल्या. त्यानंतर या दोन गटांमध्ये टोळीयुद्ध सुरू झाले. याप्रकरणी सध्या पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. द हिंदूच्या वृत्तानुसार, उडुपी टाऊन पोलिसांनी 18 मेच्या रात्री झालेल्या टोळीयुद्धात सहभागी असलेल्या दोघांना अटक केली आहे. चार जण अद्याप फरार आहेत. त्यांच्या शोधात पोलीस छापे टाकत आहेत. मात्र, उडुपी टाऊन पोलिसांनी व्हायरल व्हिडिओची दखल घेत 6 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 


4 जण अद्याप फरार  


उडुपी टाऊन पोलिसांनी आशिक आणि रकीब अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. हे दोन्ही आरोपी कौपच्या गरुड टोळीशी संबंधित असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. ही घटना 18 मे रोजी घडली असली तरी या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तर, या घटनेत सहभागी असलेले अन्य 4 जण फरार आहेत. 






आरोपीच्या शोधात पोलिसांची छापेमारी


पोलिसांनी आरोपींकडून दोन कार आणि दोन मोटारसायकल, एक तलवार आणि एक खंजीर जप्त केला आहे. यासोबतच या घटनेत सहभागी असलेल्या इतर लोकांच्या शोधात पोलीस सातत्याने छापे टाकत आहेत. आरोपी लवकरच पोलिसांच्या ताब्यात जाईल, असे पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. आर्थिक वादातून दोन गटात टोळीयुद्ध झाल्याचे बोललं जात आहे. 


दोन्ही टोळ्यांमध्ये धारदार शस्त्रांनी मारामारी 


सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओ क्लिपमध्ये दोन कारचे चालक एकमेकांच्या वाहनांना धडकताना दिसत आहेत, तर एका कारचा चालक एका व्यक्तीला धडकताना दिसत आहे. यासोबतच दोन्ही कारमधील सुमारे 5 ते 6 जण एकमेकांच्या गाडीवर धारदार शस्त्रांनी हल्ला करताना दिसत आहेत. मात्र, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर उडुपी टाऊन पोलिसांनी कारवाई करत एफआयआर नोंदवला. सध्या पोलीस पुढील तपास करत आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या