India Alliance Loksabha Election : लोकसभा निवडणुकीत भाजपकडून 300 वर जागा जिंकल्याचा दावा केला जात असतानाच इंडिया आघाडीने सुद्धा आता बहुमताचा 272 जागांचा टप्पा ओलांडल्याचा दावा केला आहे. काँग्रेस नेते पवन खेरा यांनी शनिवारी इंडिया आघाडीच्या बहुमताचा दावा केला. पवन खेरा म्हणाले की, लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यापर्यंत आमच्या आघाडीने 272 जागांचा विजयाचा टप्पा ओलांडला आहे. पाचव्या टप्प्यानंतरच्या मतदानाच्या सहाव्या आणि सातव्या टप्प्यात आम्हाला मिळणाऱ्या जागा या बोनस असल्याचं ते म्हणाले.


'भाजपच्या लोकांना निवडणूक लढवता येत नाही'


काश्मीरमधील कलम 370 हटवल्यानंतर होणाऱ्या निवडणुकीत मतदार उत्साहाने सहभागी होत असल्याच्या प्रश्नावर पवन खेरा म्हणाले की, यापूर्वी (यूपीए सरकारच्या काळात) काश्मीरमध्ये 72 टक्के मतदान झाले होते. पण, आता परिस्थिती अशी आहे की, भाजपच्या लोकांना तिथून निवडणूकही लढवता येत नाही. शनिवारी देशाच्या सहा राज्यांत आणि दोन केंद्रशासित प्रदेशांतील 58 जागांवर सहाव्या टप्प्यातील मतदान झाले. सहाव्या टप्प्यात हरियाणाच्या सर्व दहा जागा, बिहारच्या आठ जागा, झारखंडच्या चार जागा, ओडिशाच्या सहा जागा, उत्तर प्रदेशच्या 14 जागा, पश्चिम बंगालच्या आठ जागा, केंद्रशासित प्रदेश दिल्लीच्या सर्व सात जागा आणि जम्मू-काश्मीरच्या एका जागेवर मतदान झाले.






पंतप्रधान मोदींना उपचाराची गरज


काँग्रेस नेते पवन खेरा यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. ते म्हणाले की, पीएम मोदी आता थकले आहेत, आजारी आहेत, त्यांना उपचाराची गरज आहे. इंडिया आघाडीला व्होट बँकेसाठी 'मुजरा' करायचा आहे, पीएम मोदींच्या या वक्तव्यावर पवन खेडा म्हणाले की, पीएम मोदींची पुन्हा जीभ घसरली आहे की अन्य काही आहे हे मला समजत नाही. त्यामुळे काय बोलावे समजत नाही. कदाचित प्रचारासाठी उन्हात जाण्याची सवय नाही, असे ते म्हणाले. राहुल गांधींना ही सवय आहे, ते चार हजार किलोमीटर चालले आहेत, असा टोला त्यांनी लगावला. 


इतर महत्वाच्या बातम्या