Delhi Vivek Vihar Baby Care Center Fire Update: नवी दिल्ली : दिल्लीतील (Delhi) बेबी केअर हॉस्पिटलला लागलेल्या आगीत 6 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाला आहे. दिल्लीतील विवेक विहार परिसरात असलेल्या बेबी केअर हॉस्पिटलमध्ये शनिवारी रात्री ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट झाल्यानंतर भीषण आग लागली. रात्री साडेअकराच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. रुग्णालयात अडकलेल्या 12 नवजात बालकांना बऱ्याच प्रयत्नांनंतर बाहेर काढण्यात आलं. मात्र, त्यापैकी सहा जणांचा मृत्यू झाला. तर 5 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जात आहे. आगीत बेबी केअर हॉस्पिटल पूर्णपणे जळून खाक झालं. आग एवढी भीषण होती की, रुग्णालयालगतची इमारतही आगीच्या भक्ष्यस्थानी आली आहे.


दिल्ली पोलिसांनी बेबी केअर हॉस्पिटलचे फरार मालक नवीन चींची विरोधात कलम 336, 304ए आणि 34 अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे. हॉस्पिटलला आगीची एनओसी होती की नाही, याचा तपास सुरू आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बेबी केअर सेंटरला अग्निशमन दलाकडून एनओसी मिळालेली नव्हती. 


इमारतीमध्ये ऑक्सिजन सिलेंडरचं अवैध रिफिलिंग सुरू होतं? 


दिल्लीतील बेबी केअर हॉस्पिटलला शनिवारी रात्री उशीरा भीषण आग लागली. ज्यावेळी बेबी केअर हॉस्पिटल आगीच्या भक्ष्यस्थानी आलं, त्यावेळी सातत्यानं लहान-मोठ्या स्फोटांचे आवाज येत होते. आजूबाजूच्या लोकांचा आरडाओरडा येत होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बिल्डिंगमध्ये ऑक्सिजन सिलेंडर ठेवण्यात आले होते. तसेच, ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट झाल्यानं आग लागल्याचंही समोर आलं होतं. त्यामुळे सर्व स्तरांमधून हाच प्रश्न उपस्थित केला जात आहे की, इथे एवढ्या मोठ्या संख्येत ऑक्सिजन सिलेंडर का ठेवण्यात आले होते. तसेच, असं करुन रुग्णालय प्रशासन नवजात बालकांच्या आयुष्याशी खेळ का करत होतं? असा सवालही उपस्थित केला जात आहे. 


बेबी केअर सेंटरच्या इमारतीत सुरू होतं बेकायदेशीररित्या ऑक्सिजन सिलिंडरच्या रिफिलिंगचं काम 


मीडिया रिपोर्ट्सनुसार, बेबी केअर सेंटरमध्ये आग लागल्यानं 6 नवजात मुलांच्या मृत्यूप्रकरणी मोठा खुलासा झाला आहे. बेबी केअर सेंटरच्या इमारतीत खाली बेकायदेशीररित्या ऑक्सिजन सिलेंडरच्या रिफिलिंगचं काम सुरू होतं. स्थानिक रहिवासी असलेल्या ब्रिजेश यांनी याबाबत अनेकदा तक्रार केली होती आणि बेबी केअर हॉस्पिटलच्या मालकालाही माहिती दिली होती. ब्रिजेशनं याबाबत काही विभागांकडे तक्रारही केली होती, मात्र कारवाई झाली नाही. 


नेमकं काय घडलेलं? 


राजधानी दिल्लीतील विवेक विहार परिसरात एका बेबी केअर हॉस्पिटलला आग लागली. या दुर्घटनेत सहा नवजात बालकं दगावली आहे. शनिवारी रात्री जवळपास साडेअकरा वाजण्याच्या सुमारास आग लागली होती. पाहता पाहता आगीचे लोळ बाहेर पडू लागले. क्षणार्धातच आगीनं भीषण रौद्ररूप धारण केलं. आगी इतकी भीषण होती की, अग्निशमन दलाच्या 9 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. दरम्यान, अद्याप आगाची कारण समोर आलेलं नाही, याप्रकरणी चौकशी सुरू आहे. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचताच त्यांनी मुलांना केंद्रातून सुखरूप बाहेर काढण्यास सुरुवात केली. अग्निशमन दलाच्या जवानांनी 12 नवजात मुलांची सुटका केली. पण, दुर्दैवानं सहा चिमुकल्यांचा होरपळून मृत्यू झाला.