Karnataka News: कर्नाटक हायकोर्टातील (Karnataka High Court) एका प्रकरणानं संपूर्ण देशाचं लक्ष स्वतःकडे खेचून घेतलं आहे. पतीनं आपल्या पत्नीला फ्रेंच फ्राईज खाण्यापासून रोखलं, तर कोर्टानं थेट लूक आऊट सर्क्युलर जारी केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. कर्नाटक कोर्टानं या प्रकरणाला स्थगिती दिली आहे. न्यायमूर्ती एम नागप्रसन्ना यांना त्या व्यक्तीवरील आरोप अत्यंत क्षुल्लक असल्याचं म्हटलं आहे. तसेच, या प्रकरणाचा तपास सुरू ठेवणं हा कायदेशीर प्रक्रियेचा दुरुपयोग होईल, असंही म्हटलं आहे. 


अमेरिकेत मुलाच्या जन्मानंतर पत्नीला फ्रेंच फ्राईज खाण्यापासून रोखल्याचा आरोप असलेल्या एका व्यक्तीविरुद्धच्या खटल्याच्या तपासाला कर्नाटक उच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे. न्यायमूर्ती एम नागप्रसन्ना यांनी त्या व्यक्तीवरील आरोप अत्यंत क्षुल्लक असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे तपासाला स्थगिती दिली. या प्रकरणाचा तपास सुरू ठेवणं हा कायदेशीर प्रक्रियेचा दुरुपयोग होईल, असंही न्यायाधीशांनी आपल्या निर्णयात म्हटलं आहे.


उच्च न्यायालयानं म्हटलं आहे की, पतीविरुद्ध कोणत्याही तपासाला परवानगी देणं हा कायद्याच्या प्रक्रियेचा गैरवापर होईल आणि तिला कधीही फ्रेंच फ्राई खाण्याची परवानगी नसल्याच्या पत्नीच्या आरोपाला बळकटी मिळेल. त्यामुळे पतीविरुद्धच्या सर्व तपासांना स्थगिती देण्याचा आदेश देण्यात आला पाहिजे. 


लूक आऊट सर्क्युलर जारी 


ज्या महिलेनं पतीविरोधात तक्रार दाखल केली, तो पती अमेरिकेत नोकरी करतो. महिलेच्या तक्रारीनंतर पतीविरोधात लूक आऊट सर्क्युलर जारी करण्यात आलं होतं. पण, आता त्यानं न्यायालयाला या प्रकरणात तपास अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं आहे. त्यानंतर त्याच्याविरोधातील लूक आऊट सर्क्युलर मागे घेण्यात आलं असून त्याला अमेरिकेला जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, प्रकरणावरील सुनावणीवेळी पत्नीच्या याचिकेला स्थगिती देण्याची विनंती पतीनं केली होती. पत्नीनं केलेली तक्रार अत्यंत किरकोळ असल्याचा युक्तिवाद पतीच्या वतीनं करण्यात आला होता.                                       


पतीच्या वतीनं युक्तीवाद करणाऱ्या वकिलांनी सांगितलं की, महिलेच्या तक्रारीनंतर पतीविरोधात एक लुक आऊट सर्कुलर (LOC) जारी करण्यात आलं. ज्यामुळे त्याला यूएसला कामावर जाण्यापासून रोखलं गेलं. कोर्टानं यापूर्वी तक्रारीत नाव असलेल्या व्यक्तीच्या पालकांविरुद्धच्या तपासाला स्थगिती देण्यात आली होती.