Karnataka BJP: 'काँग्रेसमुक्त भारत' अशी घोषणा देणाऱ्या भाजपसमोर (BJP) आता आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election 2024) आव्हानं निर्माण होण्याची शक्यता आहे. कर्नाटकमधील पराभवानंतर दक्षिण भारतातील प्रमुख राज्यांमध्ये आता भाजप सत्तेत नाही. दक्षिण भारतात (South India) राजकीय प्रभाव वाढवण्याच्यादृष्टीने भाजपसाठी कर्नाटक हे महत्त्वाचे राज्य होते. आता, कर्नाटकमध्येच पराभव झाल्याने लोकसभा निवडणुकीच्या 'मिशन 400' समोर आव्हान निर्माण झाले आहे.
भाजपने पुढील लोकसभा निवडणुकीसाठी 400 जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्यासाठीची चाचपणी आणि रणनीती आखली जात आहे. उत्तर भारतात मजबूत असणारा भाजप दक्षिण भारतात आपला प्रभाव वाढवण्याच्या प्रयत्नात आहे. कर्नाटक हे भाजपसाठी दक्षिणेतील प्रवेशद्वार असल्याचे म्हटले जाते. मात्र, आजच्या पराभवानंतर भाजपला लोकसभा निवडणुकीसाठी नव्याने रणनीती आखावी लागणार आहे. भाजपला मतांच्या टक्केवारीत फारशी घट झाली नाही, हीच समाधानाची बाब पक्षासाठी आहे.
2019 मध्ये निकाल काय होता?
2019 मध्ये कर्नाटकमधील 28 पैकी 25 जागांवर भाजपला विजय मिळाला होता. तर, एका जागेवर भाजपने पाठिंबा दिलेला उमेदवार विजयी झाला होता. काँग्रेस-जेडीएसला प्रत्येकी एका जागेवर विजय मिळाला. कर्नाटक विधासभेत पराभव झाल्याने आता भाजपला ही कामगिरी पुन्हा करणे कितपत शक्य आहे, यावर प्रश्न निर्माण झाले आहेत.
दक्षिणेकडील सहा राज्यांमध्ये लोकसभेच्या 130 जागा आहेत. एकूण लोकसभेच्या जागांपैकी सुमारे 25 टक्के आहेत. अशा परिस्थितीत दक्षिण भारत राजकीयदृष्ट्याही खूप महत्त्वाचा आहे. 2019 मध्ये, कर्नाटक आणि तेलंगणामध्ये भाजपला जागा मिळाल्या, परंतु उर्वरित दक्षिणेकडील राज्यांमध्ये भाजपला अपयश मिळाले. पाँडिचेरीमध्ये भाजप हा आघाडीतील दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असून सत्तेत आहे. तर, इतर राज्यांमध्ये भाजप सत्तेत नाही.
आता कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला धक्का बसला आहे. त्यामुळे तेलंगणा, आंध्र प्रदेशसह इतर दक्षिणेकडील राज्यांमध्ये भाजपसमोर आव्हाने आहेत. कर्नाटकमध्ये पराभव झाला असला तरी भाजपला लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून राहावे लागणार आहे. तर, राजस्थान सारखी कामगिरी करता येईल. राजस्थान विधानसभेत भाजपचा पराभव झाला होता. मात्र, लोकसभेत भाजपने दणदणीत विजय मिळवत क्लिन स्वीप केला होता.
दक्षिणेकडील राज्यांमध्ये किती जागा?
आंध्र प्रदेशमध्ये लोकसभेच्या 25 जागा आहेत. त्यापैकी वायएसआर काँग्रेसने 22 जागांवर विजय मिळवला. तर, तेलगू देसम पक्षाला तीन जागांवर मिळाला होता. तेलंगणामध्ये 17 जागा आहेत. 2019 च्या निवडणुकीत चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस पक्षाला 9 जागांवर विजय मिळाला होता. तर, भाजपला 4 जागांवर आणि काँग्रेसला तीन जागांवर विजय मिळाला. तामिळनाडूमध्ये लोकसभेच्या 39 जागा आहेत. त्यापैकी डीएमके आणि आघाडीने 38 जागांवर विजय मिळवला होता. तर, अण्णाद्रमुक-भाजप आघाडीला एका जागेवर विजय मिळाला होता. केरळमध्ये 20 जागा आहेत. काँग्रेसच्या नेतृत्वातील युडीएफला 18 जागांवर विजय मिळला. तर, दोन जागांवर डाव्या आघाडीला विजय मिळाला होता.
भाजपचे समीकरण बिघडले?
लोकसभेच्या 48 जागा असणाऱ्या महाराष्ट्रात आणि 40 जागा असणाऱ्या बिहारमध्ये भाजपसमोर अधिक आव्हाने आहेत. भाजपने आपले मित्रपक्ष गमावले आहेत. महाविकास आघाडीमुळे भाजपला महाराष्ट्रात मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील 48 पैकी किमान 34 जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होण्याची शक्यता असल्याचे सर्वेक्षणात समोर आले होते. तर, बिहारमध्ये नितीशकुमार हे महाआघाडीत आल्याने आता भाजपसमोर अधिक आव्हान निर्माण झाले आहे. पश्चिम बंगालमध्येही 2019 मधील कामगिरीची पुनरावृत्ती करणे भाजपसाठी कठीण दिसत आहे.