मुंबई : कर्नाटकातील एका वृद्ध दाम्पत्याने सरोगसीच्या माध्यमातून आपल्या मृत मुलाला अपत्यप्राप्ती व्हावी, यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मुलाच्या जिवंतपणी सुरु केलेली सरोगसीची प्रक्रिया त्याच्या मृत्यूनंतरही पुढे चालू ठेवण्याचे निर्देश सोलापुरातील आयव्हीएफ सेंटरला द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. संपत्तीला वारस मिळण्यासाठी या दाम्पत्याचा खटाटोप सुरु आहे.

हे दाम्पत्य कर्नाटकातील कलबुर्गीत राहतं. 70 वर्षीय याचिकाकर्ते हे सरकारी कॉलेजचे निवृत्त प्राचार्य आहेत, तर त्यांची पत्नी 65 वर्षांची आहे. सोलापुरातील नवजीवन फर्टीलिटी अँड आयव्हीएफ सेंटरने सरोगसीची पद्धत सुरु ठेवण्यास असमर्थता दर्शवल्याची तक्रार दाम्पत्याने केली आहे. याचिकाकर्त्यांच्या सुनेने त्यासंबंधीची संमती काढून घेतल्याचं कारण आयव्हीएफ सेंटरने दिलं आहे.

संबंधित याचिकाकर्त्यांच्या मुलाचं लग्न नोव्हेंबर 2014 मध्ये झालं होतं. त्याला कोणतंही अपत्य नव्हतं. त्यामुळे त्यांचा मुलगा आणि सुनेने सोलापुरातील आयव्हीएफ सेंटरला भेट दिली. तेव्हा त्यांच्यासमोर आयव्हीएफ आणि सरोगसीचे पर्याय ठेवण्यात आले होते. त्यांनी सरोगसीचा पर्याय निवडला होता.

भावाच्या अपत्यासाठी मृत तरुणाच्या बहिणी गर्भ भाड्याने देण्यास तयार होत्या. आयव्हीएफ सेंटरने सरोगसी प्रक्रिया सुरु केली. तरुण दाम्पत्याकडून शुक्राणू आणि बीज घेण्यात आले. भ्रूणनिर्मितीची प्रक्रिया यशस्वी झाली, मात्र सरोगेट आईच्या गर्भात भ्रूण ठेवण्यापूर्वीच याचिकाकर्त्यांच्या मुलाचा 2 ऑक्टोबर 2017 रोजी मृत्यू झाला.

पतीच्या निधनानंतर याचिकाकर्त्यांच्या सूनेने सरोगसीची संमती रद्द केली. त्यामुळे आयव्हीएफ सेंटरने सरोगसी प्रक्रिया थांबवली. भ्रूणाचं जीवनमान 60 महिन्यांचं असल्यामुळे 2021 पर्यंत तो वापरता येऊ शकतो. मात्र मुलाच्या मृत्यूनंतर सूनेने संमती रद्द केल्याने सरोगसी होऊ शकत नाही, असं आयव्हीएफ सेंटरने तोंडी सांगितल्याचं याचिकाकर्त्यांनी म्हटलं आहे.

आपल्या 27 वर्षांच्या सुनेले पुनर्विवाहाचा अधिकार आहे. अपत्याचा तिच्या आयुष्यावर कोणताही परिणाम होऊ देणार नाही. आपण बाळाचं योग्य पालनपोषण करु, अशी हमी याचिकाकर्त्या वृद्द दाम्पत्याने दिली आहे.