जम्मू-काश्मीर पोलीस, सीआरपीएफचे प्रमुख अधिकारी आणि लष्कराचे वरीष्ठ अधिकारी लेफ्टनंट जनरल केजेएस ढिल्लोन यांनी आज संयुक्त पत्रकार परिषद घेतली. ढिल्लोन यांनी सांगितले की, "गेल्या 21 दिवसांमध्ये भारतीय लष्कर आणि पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये पुलवामा हल्ल्यामागचा सूत्रधार मुदस्सीर अहमद याला ठार करण्यात आले आहे. त्यानेच भारतात घुसखोरी करून पुलवाम्याचा कट रचला होता."
ढिल्लोन यांनी सांगितले की, ठार केलेल्या 18 दहशतवाद्यांपैकी 14 जण जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे होते. तर त्यापैकी 6 जण हे जैशचे टॉपचे कमांडर होते. लष्कराकडून गेल्या 70 दिवसांपासून कारवाई सुरु आहे. या 70 दिवसांत आपल्या जवानांनी 44 दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं आहे.
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचं उल्लंघन असल्याची माहिती ढिल्लोन यांनी दिली. त्यांनी सांगितले की, 2018 मध्ये पाकिस्तानी सैन्याने 1629 वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं होतं. या वर्षी हे प्रमाण वाढलं आहे. गेल्या दोन महिन्यात पाकिस्तानने 478 वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे.