सुजय विखे पाटील राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्यास तयार नसल्याची माहिती आहे. काँग्रेसमधून तिकीट न दिल्यास वेगळा विचार करण्याचा त्यांचा पवित्रा आहे. सुजय यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांवरुन राधाकृष्ण विखे पाटलांना हायकमांडचं बोलावणं आलं होतं.
अहमदनगरची जागा सुटत नसल्यामुळे विखे पाटलांची नाराजी आहे. पक्षातल्या अंतर्गत राजकारणाबद्दलही त्यांनी हायकमांडकडे तक्रार केली. विरोधी पक्षनेत्याची ही अवस्था होत असेल तर इतरांना काय सांगायचं? अशी उद्विग्न प्रतिक्रिया विखे पाटलांनी राहुल गांधींकडे व्यक्त केली.
सुजय विखे पाटील भाजपच्या वाटेवर, तर राधाकृष्ण विखे पाटील...
शेवटी अंतर्मनाचा आवाज ऐकून पुढची भूमिका ठरवावी लागणार, असं अत्यंत सूचक आणि गर्भित इशारा असलेलं वक्तव्य विखे पाटलांनी केलं.
याआधी, सुजय विखे पाटलांचा भाजपप्रवेश थांबवण्याचा प्रयत्न काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला होता. सुजय यांना राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव देण्यात आला. काँग्रेस नेत्यांची राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत यासंदर्भात फोनवर चर्चा झाली असून राष्ट्रवादीला प्रस्ताव मान्य असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादीचे नेते पवारांशी याबाबत चर्चा करणार आहेत.
सुजय विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशाला अहमदनगरमधील भाजपच्या कार्यकर्त्यांनीही विरोध केला. भाजपचे अहमदनगरचे खासदार दिलीप गांधी यांच्या समर्थकांनी सुजय विखे यांच्या प्रवेशाविरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर घोषणाबाजी केली.
सुजय विखे पाटील अहमदनगरमधून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र अहमदनगरची जागा राष्ट्रवादीकडे गेल्याने सुजय यांनी भाजपत जाण्याचा निर्णय घेतला. सुजय 12 मार्च रोजी दुपारी 12 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.