कर्नाटक निवडणुकीत 224 पैकी 222 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत, भाजपने सर्वाधिक 104 जागा मिळवल्या. तर काँग्रेस 78 आणि जेडीएसने 38 जागा मिळवल्या आहेत. मात्र काँग्रेसने जेडीएसला पाठिंबा दिल्याने, त्यांनी सत्ता स्थापनेसाठी दावा केला आहे.
पण भाजपनेही सर्वात मोठा पक्ष ठरल्याने सत्तेचा दावा केला आहे. त्यामुळे कर्नाटकात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. 112 हा बहुमताचा आकडा कोण गाठणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
भाजपकडून फोडाफोडी
सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपला 8 जागा कमी पडत आहेत. त्यामुळे साहजिकच भाजपकडून अन्य पक्षाच्या आमदारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यासाठी भाजपकडून विविध ऑफर दिल्या जात असल्याचा दावा काँग्रेस आमदारांनी केला आहे.
लिंगायत आमदारांवर नजर
सूत्रांच्या मते, भाजपने काँग्रेसच्या 7 लिंगायत आमदारांवर नजर ठेवली आहे. त्यांच्याशी संपर्क साधून आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न सुरु आहे.
हे तेच काँग्रेसचे आमदार आहेत ज्यांचा जेडीएस आणि कुमारस्वामींच्या मुख्यमंत्रीपदाला विरोध आहे.
इतकंच नाही तर 5 असे आमदार आहेत जे जेडीएसमधून काँग्रेसमध्ये आले आहेत. त्यामुळे ते आधीच जेडीएसवर नाराज आहेत.
त्यामुळे जेडीएसशी आघाडी करण्याच्या काँग्रेसच्या फॉर्मुल्यावर ते नाखूश आहेत.
भाजप संधी साधण्याच्या प्रयत्नात
नेमकी हीच संधी साधण्याचा प्रयत्न भाजप करत आहे.
काँग्रेसमधील लिंगायत 7 आणि जेडीएसमधून काँग्रेसमध्ये आलेले 5 अशा 12 आमदारांच्या संपर्कात भाजप आहे.
राज्यपाल भाजपलाच संधी देणार?
दुसरीकडे राज्यपाल वजूभाई वाला हे पहिल्यांदा भाजपलाच सरकार बनवण्यासाठी निमंत्रण देण्याची शक्यता आहे.
सध्या भाजपचे कर्नाटक प्रभारी प्रकाश जावडेकर, धर्मेंद्र प्रधान आणि जे पी नड्डा हे बंगळुरुत आहेत. सत्तेसाठी अनेक वाटाघाटी त्यांच्याकडून सुरु आहेत.
येडियुरप्पा विधीमंडळ नेते
भाजपने येडियुरप्पांची विधीमंडळ नेतेपदी नियुक्ती केली. त्यामुळे येडियुरप्पा राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा दावा केला.
राज्यपालांनी येडियुरप्पांना सरकार स्थापनेसाठी आमंत्रित केलं, तर उद्याच बंगळुरुत त्यांचा शपथविधी होईल.
बहुमताची परीक्षा
शपथ घेतल्यानंतर येडियुरप्पा लवकरात लवकर बहुमत सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करतील.
अशा परिस्थितीत काँग्रेसचे 7 आणि जेडीएसचे 5 आमदार एकतर सभागृहात गैरहजर राहतील किंवा भाजपला मतदान करतील.
जर काँग्रेस-जेडीएसचे 12 आमदार सभागृहात गैरहजर राहिले, तर बहुमताचा आकडा आपोआप कमी म्हणजेच 104 होईल. तेव्हा भाजप 104 आणि 1 अपक्षासह बहुमत सिद्ध करु शकतं.
दुसरा फॉर्मुला
काँग्रेस आणि जेडीएसच्या 12 आमदारांनी भाजपला मतदान केलं तर भाजप 104+1+12 म्हणजेच 117 आमदारांचा पाठिंबा मिळेल. जो बहुमत 112 पेक्षा जास्त असेल.
2008 मध्ये काय झालं होतं?
2008 मध्ये येडियुरप्पा मुख्यमंत्री झाले होते तेव्हा भाजपकडे 110 आमदार होते. त्यावेळी 6 अपक्षांचा पाठिंबा घेत येडियुरप्पांनी बहुमत सिद्ध केलं होतं.
मात्र काही दिवसांनी येडियुरप्पांनी काँग्रेसच्या 11 आमदारांना फोडून, त्यांना राजीनामा द्यायला लावला होता. तसंच त्यांना पुन्हा निवडणूक लढवायला लावून, जिंकून आणलं आणि आपल्या बाजूने वळवलं होतं.
सध्या भाजप तोच प्रयत्न करताना दिसत आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणूक निकाल 2018
- भाजप 104
- काँग्रेस 78
- जनता दल (सेक्युलर) 37
- बहुजन समाज पार्टी 1
- कर्नाटक प्रज्ञावंत जनता पार्टी 1
- अपक्ष 1
- एकूण 222
संबंधित बातम्या
कर्नाटकात भाजपची काल रात्री एक जागा कमी झाली, आज वाढली!
कर्नाटकात रिसॉर्ट पॉलिटिक्स, काँग्रेसकडून 100 रुम बूक
कर्नाटक: भाजप आज सत्ता स्थापनेचा दावा करणार
कर्नाटकात ट्विस्ट: सर्वात कमी जागा, तरीही जेडीएसचा मुख्यमंत्री?
खरे किंगमेकर तर कर्नाटकचे राज्यपालच!
कोण आहेत कुमारस्वामी?