वाराणसी : उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये उड्डाणपुलाचा भाग कोसळून मोठी दुर्घटना घडली. यामध्ये आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जणांना वाचवण्यात आलं आणि अनेक जण जखमी आहेत. दुसरीकडे हलगर्जीपणा करणाऱ्या चार अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. यामध्ये प्रकल्प अधिकाऱ्याचाही समावेश आहे.

उत्तर प्रदेश स्टेट ब्रिज कॉर्पोरेशनकडून या पुलाचं बांधकाम सुरु होतं. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदत देण्याची घोषणा केली आहे.

वाराणसीतील कँट स्टेशनजवळ उड्डाणपुलाचा स्लॅब कोसळून अनेक गाड्या दबल्या गेल्या, तर यामध्ये तिथे असणारे अनेक लोकही दबले गेले. या निर्माणाधीन उड्डाणपुलाखालून मोठी वाहतूक होती. जो भाग गाड्यांवर कोसळला, तो भाग दोन महिन्यांपूर्वीच ठेवण्यात आला होता. मात्र तो लॉक करण्यात आलेला नव्हता, असं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे.

दरम्यान, मध्यरात्री योगी आदित्यनाथ यांनी घटनास्थळाला भेट दिली. त्यांनी जिल्हा प्रशासन आणि संबंधित विभागाला युद्धपातळीवर मदत देण्याचे आदेश दिले. बचावकार्यासाठी एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली होती.