बंगळुरु : जनता दल सेक्युलरचे नेते एच. डी. कुमारस्वामी बुधवारी कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणार आहेत. कुमारस्वामी बुधवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. राज्यपाल वजूभाई वाला यांची भेट घेतल्यानंतर यासंबंधी घोषणा करण्यात आली.

कुमारस्वामी यांचा शपथविधी सोमवारी होणार होता, मात्र 21 मे रोजी राजीव गांधी यांचा स्मृतिदिन असल्यामुळे हा सोहळा पुढे ढकलण्यात आला आहे. शपथविधीची जागा आणि वेळ अद्याप निश्चित झालेली नाही.

कुमारस्वामी काँग्रेसच्या पाठिंब्याने कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रं हाती घेतील. सोमवारी कुमारस्वामी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत.

मोठ्या नाट्यमय घडामोडीनंतर अवघ्या 55 तासात कर्नाटकातील भाजपचं सरकार पडलं. येडियुरप्पा यांनी 17 मे म्हणजेच गुरुवारी सकाळी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली होती. बहुमत सिद्ध करण्यापूर्वीच मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांनी राजीनामा दिला. त्यामुळे कर्नाटकात आता काँग्रेस आणि जेडीएसचं सरकार सत्तेवर येणार आहे.

कोण आहेत कुमारस्वामी?

एच. डी. कुमारस्वामी हे जनता दलचे (सेक्युलर) सर्वेसर्वा आणि भारताचे माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचे सुपुत्र आहेत. हरदानहल्ली देवेगौडा कुमारस्वामी असे 58 वर्षीय कुमारस्वामींचे संपूर्ण नाव आहे. कर्नाटकमध्ये कुमारस्वामी यांना 'कुमारअण्णा' म्हणून ओळखले जाते. कुमारस्वामी यांना राजकारणाचे धडे घरातूनच मिळाले आहेत.

जनता दल (सेक्युलर) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या कुमारस्वामी यांनी 3 फेब्रुवारी 2006 ते 9 ऑक्टोबर 2007 या कालावधीत कर्नाटकच्या 18 व्या मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळली होती.

1996 साली रामनगरा जिल्ह्यातील कनकापुरा लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून विजयी होत, कुमारस्वामी यांनी राजकारणात प्रवेश केला. मात्र 1998 साली याच मतदारसंघात पुन्हा निवडणुका झाल्या आणि त्यावेळी त्यांचा अत्यंत दारुण पराभव झाला. यावेळी त्यांचा डिपॉझिटही जप्त झाले होते.

त्यानंतर 1999 साली सथनौर मतदारसंघातून कुमारस्वामींनी पुन्हा लोकसभा निवडणूक लढवली. मात्र त्यावेळीही ते पराभूत झाले.

2004 साली ते विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले. त्यावेळी कुणालाही बहुमत मिळाले नाही. त्यामुळे जेडीएसने काँग्रेससोबत सत्ता स्थापन केली. त्यावेळी काँग्रेसच्या धरम सिंह यांना मुख्यमंत्री करण्यात आले.

मात्र हे सरकार येडियुरप्पा आणि स्वत: कुमारस्वामी यांनी खाली खेचलं आणि सत्ता स्थापन केली. दोन्ही पक्षांमध्ये 20-20 महिने विभागणी झाली. त्यावेळी भाजपच्या मदतीने कुमारस्वामी मुख्यमंत्री बनले आणि येडियुरप्पा उपमुख्यमंत्री बनले. पण स्वत:ची टर्म संपल्यावर कुमारस्वामींनी येडियुरप्पांना पाठिंबा देण्यास नकार दिला आणि सरकारमधूनही ते बाहेर पडले. येडियुरप्पांना मुख्यमंत्री म्हणून सातच दिवसात राजीनामा द्यावा लागला.

खासदार, आमदार, विधानसभेचे विरोधी पक्षनेते या संसदीय पदांसोबत त्यांनी जनता दल (सेक्युलर) पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुराही सांभाळली आहे. ते जनता दल (सेक्युलर) पक्षाचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष आहेत.

कुमारस्वामींनी कोणती पदं भूषवली आहेत?

1996 : 11 व्या लोकसभेत ते निवडून गेले.
2004–08 : कर्नाटक विधानसभेत ते आमदार म्हणून निवडून गेले.
फेब्रुवारी 2006 - ऑक्टोबर 2007 : कर्नाटकचे मुख्यमंत्री
2009 : 15 व्या लोकसभेत निवडून गेले.
31 ऑगस्ट 2009 : ग्रामीण विकास समितीचे सदस्य
15 ऑक्टोबर 2009 : अन्न व्यवस्थापन समितीचे सदस्य
31 मे 2013 : कर्नाटक विधानसभेत विरोधी पक्षनेते
संबंधित बातम्या :

येडियुरप्पांचा राजीनामा, कर्नाटकात भाजपचं सरकार कोसळलं

येडियुरप्पा देशातील सर्वात कमी कालावधीचे मुख्यमंत्री

येडियुरप्पांच्या मुलाने काँग्रेसच्या दोन आमदारांना डांबलं?