224 सदस्यसंख्या असलेल्या कर्नाटक विधानसभेचा कार्यकाळ 28 मे रोजी पूर्ण होत आहे. कर्नाटकात सध्या 122 आमदारांसह काँग्रेस सत्तेत आहे. निवडणूक आयोगाने तारीख जाहीर करण्यापूर्वीपासूनच सर्व राजकीय पक्षांचा जोरात प्रचार सुरु आहे. भाजपाध्यक्ष अमित शाह सध्या दोन दिवसीय कर्नाटक दौऱ्यावर आहेत. तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी विविध टप्प्यांमध्ये प्रचार करत आहेत. काँग्रेसकडून मुख्यमंत्री सिद्धरामैय्या, तर भाजपकडून बीएस येडियुरप्पा मैदानात आहेत.
कर्नाटक विधानसभेत सध्या कुणाच्या किती जागा?
काँग्रेस – 122
भाजप – 43
जेडीएस – 34
बीएसआरसी – 3
केजेपी – 2
केएमपी – 1
अपक्ष - 8
2014 च्या लोकसभा निवडणुकीचा कर्नाटकातील निकाल
कर्नाटकात 2014 च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाट दिसून आली होती. भाजपने कर्नाटकातील 28 लोकसभेच्या जागांपैकी 17 जागांवर विजय मिळवला. राज्यातील सत्ताधारी काँग्रेसला केवळ 9 जागांवर समाधान मानावं लागलं. तर जेडीएसने 2 जागा जिंकल्या होत्या. भाजपला 43 टक्के, काँग्रेसला 41.2 टक्के आणि जेडीएसला 11.1 टक्के मतं मिळाली होती.
कर्नाटकात कुणाचा किती दबदबा?
यावेळी कर्नाटक विधानसभा निवडणुकीत लिंगायत समाजाचा मुद्दा चर्चेत असेल. कर्नाटकात दलितांनंतर लिंगायत सर्वात मोठा समाज असल्याचं बोललं जातं. इथे जवळपास 17 टक्के लिंगायत आहेत. काँग्रेसने निवडणुकीपूर्वीच लिंगायत कार्ड खेळत लिंगायतांना स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला, ज्यावर अंतिम निर्णय केंद्र सरकारला घ्यायचा आहे. लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा द्यावा ही जुनी मागणी आहे. याशिवाय कर्नाटकात मुस्लीम आणि वोक्कालिगा समाजाचीही निर्णायक भूमिका असेल.
कर्नाटक विधानसभा निवडणूक प्रतिष्ठेची कशामुळे?
लोकसभा निवडणुकीपूर्वी या निवडणुकीला अत्यंत महत्त्व आहे. कारण, काँग्रेस आणि भाजप या दोन्हीही पक्षांना लोकसभा निवडणुकीअगोदर या निवडणुकीत स्वतःला सिद्ध करावं लागेल. भाजप काँग्रेसला आणखी एका राज्यातून हाकलण्यासाठी प्रयत्न करेन, तर काँग्रेस आपल्या हातात असलेलं एकमेव मोठं राज्य टिकवण्यासाठी प्रयत्न करणार आहे.