चेन्नई : राज्यसभा खासदार शशिकला पुष्पा यांनी डॉ. बी रामास्वामी यांच्याशी सोमवारी सकाळी विवाह केला. कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन करत झालेलं हे लग्न कोर्टाचा अवमान मानला जातो.
रामास्वामी यांचं पहिलं लग्न कायदेशीरदृष्ट्या वैध असल्यामुळे मदुराईच्या फॅमिली कोर्टाने शशिकला आणि रामास्वामी यांच्या लग्नाला स्थगिती दिली होती.
रामास्वामी यांनी आपल्याला अद्याप घटस्फोट दिला नसल्याची तक्रार सत्यप्रिया नामक 34 वर्षीय महिलेने केली होती. त्यानंतर मदुराई कोर्टाने हस्तक्षेप करत रामास्वामींच्या दुसऱ्या लग्नाला स्थगिती दिली होती. मुलगी झाल्यामुळे आपल्याला नाकारल्याचा दावा सत्यप्रियाने केला आहे.
'याचिकाकर्त्या सत्यप्रिया यांनी सादर केलेल्या कागदपत्रांनुसार प्रथमदर्शनी त्यांचं लग्न वैध दिसत आहे. जर रामास्वामी यांना दुसरं लग्न करायचं असेल, तर त्यांनी कोर्टाकडून दिलसा मिळवावा.' असं कोर्टाने सांगितलं.
दिल्लीतील हॉटेल ललितमध्ये खासदार शशिकला पुष्पा या डॉ. बी रामास्वामी यांच्यासोबत विवाहबंधनात अडकल्या. शशिकला या तामिळनाडूतून खासदारपदी नियुक्त झाल्या आहेत.