मंगळुरु : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत विजयासाठी भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु आहे. त्यातच एक विचित्र घटना कर्नाटकात घडली आहे. मंगळुरुच्या स्थानिक काँग्रेस नेत्याने सकाळी काँग्रेसचा राजीनामा देऊन भाजपत प्रवेश केला. पण संध्याकाळपर्यंत पुन्हा भाजपला रामराम करुन काँग्रेसमध्ये घरवापसी केली.


कर्नाटक सरकारमधील वनमंत्री बी रामनाथ राय यांच्याविरोधात निवडणूक लढणारे भाजप नेते यू राजेश नाईक यांनी रविवारी एका कार्यक्रमात काँग्रेस नेते सुंदर देवीनागर यांचं पक्षात स्वागत केलं. पण काही तासातच मणीमधील आयोजित एका कार्यक्रमात त्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये घरवापासी केली.

सुंदर देवीनागरा यांच्याकडे पनेमनगलुरु प्रांताची जबाबदारी आहे.

सध्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीमुळे मोठ्याप्रमाणात पक्षांतर सुरु आहे. अनेक दिग्गज नेते स्वपक्षाला रामराम करुन विरोधी पक्षात प्रवेश करत आहेत.

रविवारी काँग्रेसचे ओबीसी नेते आणि सहा वेळा आमदार राहिलेले मलिकय्या गुत्तेदार यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या उपस्थितीत गुत्तेदार यांनी भाजपचा झेंडा आपल्या खांद्यावर घेतला. सध्या ते गुलबर्गा विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत.