पती आपल्यासोबत अत्यंत क्रौर्याने वागतो, सोबत राहण्याची इच्छा नसतानाही पती बळजबरीने राहण्यास भाग पाडतो, अशी तक्रार एका महिलेने केली होती. पतीने मात्र आपली एकत्र नांदण्याची इच्छा असल्याचं कोर्टात सांगितलं होतं. या फौजदारी खटल्यावरील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने आपलं मत स्पष्ट केलं.
'पत्नी म्हणजे जंगम मालमत्ता किंवा वस्तू नव्हे, तिला तुझ्यासोबत राहण्याची इच्छा नसल्याचं ती सांगते, मग तू पत्नीसोबत राहायचं असं कसं म्हणू शकतोस?' असा प्रश्न सुप्रीम कोर्टाने विचारला.
न्यायाधीश मदन बी. लोकूर आणि दीपक गुप्ता यांच्या खंडपीठाने ही सुनावणी केली. पत्नीसोबत राहण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याचा सल्लाही कोर्टाने तिला दिला.
पतीच्या क्रूर वागणुकीच्या पार्श्वभूमीवर पत्नीला घटस्फोट मिळावा, अशी मागणी महिलेच्या वकिलांनी केली आहे. आम्ही पतीविरुद्ध फौजदारी खटला मागे घेण्यास तयार आहोत. आम्हाला पोटगीही नको, मात्र तिला त्याच्यासोबत राहायचं नाही, असे वकिलांनी स्पष्ट केलं. दोघांनी संमतीने वेगळे व्हावे, असा सल्ला न्यायालयाने दिला होता.