गांधीनगर : हिंदू महासभेचे नेते कमलेश तिवारी यांची तीन दिवसांपूर्वी अज्ञात व्यक्तींकडून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. लखनौ नाका भागात कमलेश तिवारी यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. तिवारी यांची हत्या करणारे हल्लेखोर लगेच तिथून फरार झाले. याप्रकरणी तपास करणाऱ्या पोलिसांनी दोन आरोपींना अटक केल्याची महिती मिळाली आहे.

अशफाक आणि मोईनुद्दीन अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. गुजरात एटीएसने दोन्ही आरोपींना गुजरात-राजस्थानच्या सीमेवरुन अटक केली आहे. अशफाक आणि मोईनुद्दीनने गुन्हा कबूल केला आहे.

गुजरात एटीएसचे उपमहानिरीक्षक हिमांशू शुक्ला यांनी याबाबत सांगितले की, आम्हाला माहिती मिळाली होती की, दोन्ही आरोपी गुजरातमध्ये घुसण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे आम्ही गुजरात-राजस्थान सीमेजवळच्या श्यामला परिसरात सापळा रचून दोघांना पकडले.

शुक्ला यांनी सांगितले की, या दोन आरोपींचा शोध घेण्यासाठी विविध टीम तपास करत होत्या. ते गुजरातला येणार असल्याची आम्हाला माहिती मिळाली, त्यानंतर आम्ही श्यामला परिसराकडे मोर्चा वळवला. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर लवकरच आम्ही या दोन्ही आरोपींना उत्तर प्रदेश पोलिसांच्या हवाली करणार आहोत.