काश्मीर खोऱ्यात पुन्हा चकमक, भारतीय जवानांकडून जैशच्या तीन दहशतवाद्यांना कंठस्नान
एबीपी माझा वेब टीम | 22 Oct 2019 10:37 PM (IST)
जम्मू काश्मीरमध्ये गेल्या तीन दिवसांपासून भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमकी सुरु आहेत. आज संध्याकाळी झालेल्या एका चकमकीत भारतीय जवानांनी तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे.
श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील त्राल परिसरात आज सायंकाळी सुरक्षाबल आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत भारतीय जवानांनी 'जैश..'च्या तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. तीनपैकी दोन दहशतवादी विदेशी असावेत असा अंदाज व्यक्त केला जात आहे. अद्याप तिन्ही दहशतवाद्यांची ओळख पटलेली नाही. दरम्यान जम्मू काश्मीर पोलिसांनी सांगितले की, त्राल परिसरात तीन दहशतवादी असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सुरक्षाबलाकडून शोधमोहीम हाती घेण्यात आली होती. सुरक्षाबलाने शोधमोहीम हाती घेतल्याची दहशतवाद्यांना कुणकुण लागल्यानंतर त्यांनी हल्ला केला. त्यास जवानांनी चोख प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. यावेळी झालेल्या चकमकीदरम्यान जवानांनी तीन दहशतवाद्यांनी ठार केले.