kamiya Jani : आज राष्ट्रीय पर्यटन दिन (National Tourism Day) देशात साजरा केला जातोय. याच निमित्ताने एबीपी माझाने प्रसिद्ध यूट्युबर, इन्फ्ल्युएन्सर काम्या जानीशी संवाद साधला. या दरम्यान काम्याने तिच्या बालपणीच्या आठवणी ते एक यूट्यूबर पर्यंतचा प्रवास नेमका कसा होता या संदर्भात उलगडा केला.
घरबसल्या, मोबाईलच्या माध्यमातून वेगवेगळ्या देशांत आपल्याला भ्रमंती करता येते, तिथलं राहणीमान, खाद्यसंस्कृती, बोलीभाषा आणि भरपूर माहिती मिळते अशी मोजकीच पण ठोस माहिती पुरवणारी काम्या जानी आतापर्यंत 45 देशांत फिरली आहे. पण भारतासारखं सुख कशात नाहीये असं स्वत: काम्या म्हणते. जेवढं तुम्ही शाळा आणि कॉलेजमध्ये शिकत नाही तेवढं तुम्ही फिरून शिकता असं काम्या जानीचं ठाम मत आहे.
'असं' होतं काम्या जानीचं बालपण...
काम्या जानी ही मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी आहे. तिचा जन्म घाटकोपरचा आहे. त्यानंतर तिने चेंबूरमध्ये वास्तव्य केलं. काम्याचे वडील स्वत: रिक्षाचालक होते. रिक्षाचालकापासून ते कार सेलरपर्यंतचा त्यांचा प्रवास मी पाहिलाय. त्यांच्याकडून मी आयुष्यात खूप मेहनत करत राहणं शिकले आहे.
'अशी' झाली 'Curley Tales' ची सुरुवात
साधारण पाच वर्षांपूर्वी कर्ली टेल्सची सुरुवात झाली असं काम्या म्हणाली. पहिल्या वर्षी फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. तेव्हा मी एकटीच होते. मी स्वत: शूट करायचे. स्वत: कंटेट तयार करून तो एडिटही करायचे. त्याकाळी माझ्या कुटुंबातील लोक सोडून कोणीच व्हिडीओ लाईक नाही करायचे. लक्ष्मी विलास पॅलेस बडोदा हा व्हिडीओ एके दिवशी अचानक व्हायरल झाला. आणि त्या व्हिडीओने पुढे करिअरची दिशा आणि यश ठरत गेलं. व्हिडीओ व्हायरल होण्यामागचा किस्सा सांगताना काम्या म्हणाली, या व्हिडीओत मी सांगितलं होतं की हा पॅलेस बखिंगम पॅलेसहून चार पटींनी मोठा आहे. असं जेव्हा उल्लेख केला तेव्हा लोकांना याची कल्पना झाली. ती स्टोरी लोकांना फार आवडली. खरंतर, आम्ही सुरुवात फेसबुकने केली, त्यानंतर यूट्यूब आणि त्यानंतर इन्स्टाग्राम असा आमचा प्रवास घडत गेला. महाराष्ट्राचा उल्लेख करताना काम्या म्हणाली की रत्नागिरी फारंच सुंदर ठिकाण आहे. कांस पठार, नागपूर, नाशिक, इगतपुरी पावसाळ्यात तर महाराष्ट्रात फिरण्याची मज्जाच वेगळी आहे. अशा शब्दांत काम्याने महाराष्ट्राबद्दलचं प्रेम व्यक्त केलं.
काम्या जानीसाठी पर्यटन म्हणजे नेमकं काय?
खरंतर पर्यटन हे काहींसाठी मेडिटेशन आहे. काहींसाठी थेरपी आहे. यावर काम्या जानी म्हणाली की, ट्रॅव्हल माझ्यासाठी जगण्याचा एक मंत्र आहे. जेवढं तुम्ही शाळा आणि कॉलेजमध्ये नाही शिकत तेवढं तुम्ही फिरून शिकता असं काम्या जानीचं ठाम मत आहे.
पंकज त्रिपाठी यांचा मूलमंत्र कायम लक्षात राहिला
मुलाखती दरम्यान काम्याने अभिनेते पंकड त्रिपाठी यांचा किस्साही सांगितला. काम्या म्हणाली, तुम्ही तुमच्याबरोबर तेच घेऊन जाता जे तुमच्या डोळ्यांनी पाहिलंय, जिभेने जे चाखलंय किंवा कानांनी जे ऐकलंय. हीच तुमची आयुष्यभराची पुंजी आहे. पंकज त्रिपाठींनी दिलेला हा कानमंत्र माझ्या कायम लक्षात राहिला.
पर्यटन का महत्त्वाचं आहे?
पर्यटन केल्याने भारताच्या आर्थिक विकासाला चालना मिळतेय. नवीन गोष्टींची माहिती मिळते. अनुभव मिळतो. तसेच, अनेक लोकांना रोजगाराची संधी निर्माण करून देतो. प्रत्येक देशासाठी पर्यटन गरजेचं आहे. भारतासारखा देश कुठेच नाही. या ठिकाणचं प्रत्येक राज्य हे एका देशासारखं आहे. प्रत्येक राज्याचं एक नाविन्य आहे. या ठिकाणची बोलण्याची पद्धत, बोलीभाषा, राहणीमान, खाद्यसंस्कृती सर्व काही वेगळं आहे.
सोलो ट्रॅव्हलबद्दल काय म्हणाली काम्या?
सगळ्यांनी सोलो ट्रॅव्हल करायला हवं. यामध्ये तुम्ही स्वत:ला एका नव्या पद्धतीने ओळखू लागता. तुम्हाला स्वातंत्र्य मिळतं. सोलो ट्रॅव्हलमध्ये तुम्हाला स्वत:चा आनंद मिळतो. सोलो ट्रॅव्हलिंगमुळे तुम्ही नवीन लोकांन भेटता. त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकता. यासाठी प्रत्येकाने सोलो ट्रॅव्हल करण्याचा सल्लाही काम्याने तरूणांना दिला.
पाहा व्हिडीओ :
महत्त्वाच्या बातम्या :