नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसमधील राजीनामा सत्र सुरुच आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांनी ट्विवटरवरून आपल्या राजीनाम्याची माहिती दिली. राहुल गांधी यांना त्यांनी आपला राजीनामा पाठवला आहे.


ज्योतिरादित्य शिंदे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं की, "जनादेशाचा आदर करत त्यांचा निर्णय स्वीकारत आहे. तसेच परावभवाची जबाबदारी घेत मी काँग्रेसच्या सरचिटणीस पदाचा राजीनामा देत आहे. राहुल गांधी यांना मी राजीनामा पाठवला आहे. माझ्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यासाठी आणि मला पक्षात कामाची मोठी संधी दिल्याबद्दल मी आभार मानतो."



राजीनाम्यानंतर ज्योतिरादित्य शिंदेंनी एबीपी न्यूजशी बोलताना म्हटलं की, हा माझा वैयक्तिक निर्णय आहे. प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखायला हवी. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचं प्रदर्शन निराशाजनक राहिलं, त्यामुळे आम्ही त्याची जबाबदारी स्वीकारली आहे. काँग्रेस मजबूत पक्ष आहे. आम्हाला पुन्हा एकदा आत्मचिंतन करावं लागणार आहे. काँग्रेस पक्षाचं नेतृत्व राहुल गांधी यांच्याकडे नाही, याचा मला खेद आहे. मात्र त्यांनी जो निर्णय घेतला, त्याचा आम्ही स्वीकार करतो. मला विश्वास आहे की, काँग्रेस पुन्हा नव्या जोमात उभी राहील.


आजच मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला. मिलिंद देवरा यांनी 26 जून रोजी दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेऊन मुंबई काँग्रेसचं अध्यक्ष पद सोडण्याची इच्छा व्यक्त केली होती.