Joshimath Land Sinking : हिमालयाच्या कुशीत वसलेलं जोशीमठ (Joshimath) सध्या मोठ्या नैसर्गिक आपत्तीला सामोरं जात आहे. उत्तराखंडच्या (Uttarakhand) जोशीमठमधील जमीन अद्यापही खचताना (Land Sinking) पाहायला मिळत आहे. जमीन, घरे, इमारतींना तडे जाण्याचे सत्र सुरुच आहे. जोशीमठमध्ये आतापर्यंत 800 हून अधिक इमारतींना तडे गेले आहेत. परिस्थिती दिवसेंदिवस बिघडतं चालली आहे. सोमवारी एका वृत्तपत्राच्या रिपोर्टनुसार, सोमवारपर्यंत जोशीमठमधील 849 इमारतींना तडे गेले आहेत. अनेक ठिकाणी जमीन खचली आहे आणि जमिनीलाही तडे गेले आहे. त्यामुळे येथील नागिरकांना गंभीर समस्यांना सामोरं जावं लागत आहे.
जोशीमठमध्ये 849 इमारतींना तडे
काही दिवसांपूर्वी इस्रोनं (ISRO) जारी केलेल्या जोशीमठच्या सॅटेलाईट इमेजेसमध्ये जोशीमठ दिवसेंदिवस कसं खचतंय, हे स्पष्ट होतंय. कार्टोसॅट-2एस उपग्रहावरून ही छायाचित्रं घेण्यात आली आहेत. एका रिपोर्टनुसार, जोशीमठमध्ये आतापर्यंत 849 इमारतींना तडे गेल्याचे आढळून आले आहे. यामधील 165 इमारती डेंजर झोनमध्ये आहेत. तसेच आतापर्यंत 237 कुटुंबांमधील सुमारे 800 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
डिसेंबर महिन्यापासून जमीन खचण्याला सुरुवात
अद्यापही जोशीमठ खचतंय. डिसेंबर महिन्याच्या अखेरपासून जोशीमठमध्ये खचण्याच्या घटनांना सुरुवात झाली. उत्तराखंडमधील चमौली जिल्ह्यात 6150 फूट उंचीवर जोशीमठ वसलं आहे. हिंदूंसाठी पवित्र चारधामपैकी एक धाम बद्रीनाथसाठी जोशीमठ हे प्रवेशद्वार आहे. या गावात 20 हजार लोकवस्ती आहे.
190 कुटुंबांना मिळाली नुकसान भरपाई
सचिव रणजित सिन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'उत्तराखंड सरकारकडून 190 बाधित कुटुंबांना मदत म्हणून 2.85 कोटी रुपये निधी देण्यात आला आहे. आतापर्यंत 237 कुटुंबांतील 800 सदस्यांना तात्पुरत्या मदत छावण्यांमध्ये हलवण्यात आले आहे. केंद्र सरकारकडून सेंट्रल बिल्डिंग रिसर्च इन्स्टिट्यूटने इमारतींवर क्रॅक मीटर बसवले असून त्यामुळे झालेल्या नुकसानीचे मूल्यांकन करण्यात आले आहे. आतापर्यंत 400 घरांच्या नुकसानीचे मूल्यांकन करण्यात आले आहे.
पाणी गळती कमी झाली
रणजित सिन्हा म्हणाले की, वाडिया इन्स्टिट्यूटने जोशीमठमध्ये तीन भूकंप केंद्रे शोधली आहेत, यावरून अधिक माहिती मिळवली जात आहे. जमिनीतून पाण्याची गळती कमी झाली आहे, याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. 2 जानेवारीपासून जेपी कॉलनीत पाणी गळती सुरु आहे. आधी प्रतिमिनिट 540 लिटर पाण्याची गळती होती. पण आता हे प्रमाण कमी झाले असून आता प्रति मिनिट 163 लिटर गळती होत आहे.