नवी दिल्ली : Johnson & Johnson ने भारत सरकारकडे आपल्या सिंगल डोस कोरोना वॅक्सिनच्या तिसऱ्या टप्प्यातील ट्रायलसाठी परवानगी मागितली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने आयात लायसेंसचीही मागणी केली आहे. काही दिवसांपूर्वी भारत सरकारनं लसीकरण अभियान जलद करण्याच्या दृष्टीने विदेशी लसीच्या आपातकालीन वापरासाठी मंजुरी देण्याची प्रक्रिया अधिक जलद केली आहे.


कंपनीने आपल्या अर्जावर निर्णय घेण्यासाठी केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटना (सीडीएससीओ) च्या कोविड-19 वर विशेषज्ञ समितीची बैठक लवकर बोलावण्याचंही आवाहन केलं आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 12 एप्रिल रोजी 'सुगम' ऑनलाईन पोर्टलमार्फत 'ग्लोबल क्लिनिकल ट्रायल डिवीजन' मध्ये आवेदन करण्यात आलं होतं. यासंदर्भात सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही कारणांमुळे जॉनसन अॅन्ड जॉन्सनने सोमवारी पुन्हा अर्ज दाखल केला होता. 


भारत सरकारने लसीकरण अभियानाबाबत मोठा निर्णय घेतला आहेत. केंद्र सरकारनं 1 मेपासून 18 वर्षांवरील सर्वांचं लसीकरण करण्यास परवानगी दिली आहे. लसीकरणासाठीची वयाची अट शिथील करण्यासोबतच केंद्र सरकारनं लसीकरण अभियानातील अनेक निर्बंधही शिथील केले आहेत. राज्य, खाजगी रुग्णालयं आणि औद्योगिक प्रतिष्ठान यांना थेट लस उत्पादकांकडून लस खरेदी करण्याची परवानगी दिली आहे. 


पुढील महिन्यापासून सुरु होणाऱ्या रिवॅक्सिनेशन अभियानाच्या तिसऱ्या टप्प्यातंर्गत लस उत्पादक आपल्या केंद्रीय औषध प्रयोगशाळेतून (सीडीएल) दर महिन्यातील लसीच्या एकूण उत्पादनाच्या 50 टक्के लसीचा पुरवठा केंद्र सरकारला देणार असून उरलेल्या 50 टक्के लसी राज्य सरकारला आणि खुल्या बाजारात विकण्याची मुभा देण्यात आली आहे. 


Johnson & Johnson कंपनीच्या कोरोना वॅक्सिनचा सिंगल डोस 


Johnson & Johnson द्वारे तयार करण्यात आलेल्या कोरोना वॅक्सिनचा केवळ एक डोसच दिला जातो. कंपनीने दिलेल्या माहितीनुसा, ही लस 2 ते 8 डिग्री सेल्सिअस तापमानात तीन महिन्यापर्यंत ठेवता येते आणि शून्य ते 20 डिग्री सेल्सिअसहून कमी तापमानात ही लस दोन वर्षांपर्यंत ठेवता येते. 


दरम्यान, या लसीचा प्रभाव जगभरात 66 टक्के आणि अमेरिकेत 72 टक्क्यांपर्यंत असल्याचं समोर आलं आहे. या एका डोसच्या वॅक्सिनची किंमत 8.5 डॉलर ते 10 डॉलर (637 रुपये - 750 रुपये) आहे. 


देशात आतापर्यंत तीन लसीना आपातकालीन वापरासाठी मंजुरी 


दरम्यान, देशात आतापर्यंत तीन वॅक्सिनच्या आपातकालीन वापरासाठी मंजुरी मिळाली आहे. ज्यामध्ये दोन कोविशील्ड आणि कोवॅक्सिन लसीचा डोस नागरिकांना देण्यात आला आहे. तर रशियाच्या स्पुतनिक व्ही कोरोना वॅक्सिनला काही दिवसांपूर्वीच मंजुरी देण्यात आली आहे. 


अमेरिकेत Johnson & Johnson लसीच्या वापराला तात्पुरती स्थगिती, रक्ताच्या गाठी तयार होत असल्याची तक्रार


Johnson & Johnson ची लस घेतल्यानंतर सहा महिलांच्या रक्तामध्ये गाठी तयार झाल्याची तक्रार आल्यानंतर अमेरिकेने या लसीच्या वापराला तात्पुरती स्थगिती आणली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास करण्यात येणार असल्याचं अमेरिकेच्या सेन्टर फॉर डिसीज कन्ट्रोल आणि फूड अॅन्ड ड्रग अॅडमिनीस्ट्रेशनच्या संयुक्त निवेदनात सांगण्यात आलंय.


Johnson & Johnson ची लस घेतल्यानंत केवळ रक्ताच्या गाठीच तयार होत नाहीत तर सोबत रक्तातील प्लेटलेट्सही कमी होत आहेत अशी तक्रार आली आहे आणि हे खूप धोकादायक आहे असं प्रशासनाने सांगितलं आहे. अमेरिकेत Johnson & Johnson च्या 68 लाख लसींचे डोस देण्यात आले असून आतापर्यंत अशा प्रकारची कोणतीही तक्रार आली नाही. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :