रांची: देशातील भाजप विरोधी सरकारं पडण्याची मालिका सुरूच असून आता त्यामध्ये झारखंडचाही (Jharkhand Political Crisis) समावेश होण्याची शक्यता आहे. खाण घोटाळ्यामध्ये आरोप झाल्यानंतर मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांची खुर्ची धोक्यात आल्यानंतर ते आता राजीनामा देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे आज राज्यपालांच्या भेटीला गेले आहेत. 


आज संध्याकाळी चार वाजता मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी कॅबिनेटची बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर ते आपल्या आमदारकीचा राजीनामा देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या राजीनाम्यानंतर ते पुन्हा एकदा सत्तास्थापनेचा दावा करण्याची शक्यता असल्याचंही सूत्रांनी सांगितलं आहे. 


आमदारकीवर आज निर्णय


खाण घोटाळ्यात नाव आल्यानंतर हेमंत सोरेन यांची आमदारकी रद्द करावी अशी शिफारस निवडणूक आयोगाने राज्यपालांकडे केली होती. या प्रकरणात त्यांची चौकशी सुरू असल्याने त्यांची आमदारकी रद्द करावी असं निवडणूक आयोगाने म्हटलं होतं. आता त्यावर झारखंडचे राज्यपाल निर्णय घेणार आहेत. त्या आधीच मुख्यमंत्री हेमंत सोरेन आपल्या आमदारकीचा राजीनामा देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 


पुन्हा सत्तास्थापनेचा दावा करण्याची शक्यता मुख्यमंत्री हेमंत सोरेन राजीनामा दिल्यानंतर पुन्हा एकदा राज्यपालांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा करणार असल्याची माहिती समोर येत आहे. 


 दरम्यान, भाजप आपलं सरकार पाडण्याचा प्रयत्न करत असून यासाठी त्यांच्याकडून घोडेबाजार करण्यात येत असल्याचा आरोप मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी केला आहे. आता सर्व आमदारांना रायपूरला हलवण्यात आलं आहे. 


नेमंक प्रकरण काय आहे? 


झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी खाण लिलाव प्रकरणात भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे. लोकप्रतिनिधी कायदा, 1951 च्या आधारे त्यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी भाजपने केली होती. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याकडे राज्य मंत्रिमंडळातील खाण आणि वनमंत्रीपद आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते शिवशंकर शर्मा यांनी खाण घोटाळ्याची सीबीआय (CBI) आणि ईडीकडे (ED) चौकशी करण्याची मागणी करत न्यायालयात दोन जनहित याचिका दाखल केल्या होत्या. 


मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी आपल्या पदाचा गैरवापर करुन स्टोन क्युरी माईन्स स्वतःच्या नावावर घेतल्याचा आरोप त्यांनी केली आहे. त्यांनी शेल कंपनीत गुंतवणूक करुन मालमत्ता मिळवल्याचाही आरोप त्यांच्यावर केला जात आहे. झारखंड विधानसभेतील विरोधी पक्षनेते बाबूलाल मरांडी यांनी देखील सोरेन यांच्यावर आरोप केले आहेत.