पणजी: गोव्यात उद्यापासून पर्यटन हंगाम सुरु होणार आहे. पर्यटन खात्याने यंदाच्या पर्यटन हंगामासाठी राज्यभरातील किनाऱ्यांवर 336 शॅकना हंगामी परवाने दिले आहेत. रशियाचे पहिले चार्टर विमान 4 ऑक्टोबरला गोव्यात येणार आहे. त्यानंतर उद्यापासून खऱ्या अर्थाने राज्यातील पर्यटक हंगाम सुरु होणार आहे. यंदा राज्यभरात 336 शॅकना हंगामी परवाने देण्यात आले आहेत. जमीन आखणीही झालेली आहे. पूर्वीच्याच जागी शॅक उभारले जाणार आहेत. 2016 ते 2019 या तीन वर्षांसाठी सरकारने शॅक धोरण तयार करुन त्यानुसार तीन वर्षांकरिता सीआरझेड परवाने दिले आहेत.
347 पैकी 336 शॅकना परवाने दिले असून, त्यात 250 शॅक उत्तर गोव्यात तर 86 शॅक दक्षिण गोव्यात आहेत. आवश्यक ते सोपस्कार पूर्ण करण्यासाठी महिनाभराचा कालावधी देण्यात आला आहे. त्यानंतर अंतिम परवाने दिले जाणार आहेत. दक्षिण गोव्यात कोलवा, बाणावली, वार्का, केळशी, वेळसांव, आरोसी, बेताळभाटी व झालोर या किना-यांवर तर उत्तर गोव्यात कळंगुट, कांदोळी, केरी, हरमल, मांद्रे, हणजुण, वागातोर, शिरदोण आणि शापोरा आदी किनाऱ्यांवर शॅकना हंगामी परवाने देण्यात आले आहेत.
किनाऱ्यांवर उभारल्या जाणाऱ्या शॅकचे देशी विदेशी पर्यटकांना मोठे आकर्षण आहे. गोव्याच्या किना-यांना भेट देणारे पर्यटक एकदा तरी कुटुंबासमवेत शॅकना भेट देणे पसंत करत असतात. स्थानिक, देशी तसेच कॉन्टीनेंटल खाद्यपदार्थ तसेच मद्य शॅकमध्ये पुरवले जाते.
यंदा सरकारने शॅकसाठीचे शुल्क 5 हजार रुपयांनी वाढवले आहे. ही वाढ धोरणानुसार असली तरी व्यावसायिकांना तशी परवडत नाही, असा सूर शॅक मालक संघटनेकडून व्यक्त केला जात आहे. 18 बाय 8 मीटर जागेसाठी गेल्यावर्षी 60 हजार शुल्क पर्यटन खात्याने घेतले होते.
यंदा 5 हजार रुपयांनी ते वाढवण्यात आले आहेत. शॅकांमध्ये काचेच्या बाटल्या वापरु नये अशा सूचना गेल्या वर्षी खात्याने केल्या असल्या तरी त्याला पर्याय सूचवला जावा, अशी शॅक मालकांची मागणी आहे. शॅकमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, प्रसाधनगृहांची सोय करणे तसेच कचरा व्यवस्थापन आदी गोष्टींची पूर्तता करण्यात सध्या शॅकमालक व्यस्त आहेत. पर्यटन हंगामातील पहिले चार्टर विमान 4 ऑक्टोबर रोजी रशिया येथून येणार आहे. ट्रॅव्हल अॅण्ड टूर असोसिएशन ऑफ गोवाचे अध्यक्ष सावियो मेसियश यांनी ही माहिती दिली.
यंदाच्या पर्यटन हंगामासाठी हॉटेल व्यावसायिक देखील सज्ज झाले आहेत. अजूनही खोल्यांचे आरक्षण तसे झालेले नाही. राज्यातील बडी तारांकित हॉटेल्स चार्टर विमानांमधून येणा-या पर्यटकांच्या प्रतिक्षेत आहेत.
अधिकृत माहितीनुसार गेल्या वर्षी पर्यटक हंगामात 981 चार्टर विमाने आली आणि त्याव्दारे 2 लाख 47 हजार 365 विदेशी पर्यटकांनी गोव्याला भेट दिली होती. त्यात रशियन पर्यटकांचा भरणा जास्त होता. गेल्या काही वर्षांमध्ये गोव्याला भेट देणाऱ्या रशियन पर्यटकांची संख्या वाढतच आहे.