Jharkhand Accident News: कावडियांच्या बसची ट्रकला जोरदार धडक, 18 भाविकांचा मृत्यू, झारखंडमध्ये भीषण अपघात
Jharkhand Accident News : झारखंडमधील देवघरमध्ये भीषण अपघात झाला आहे. बस आणि ट्रकमध्ये जोरदार धडक झाल्याने 18 भाविकांचा मृत्यू झाला आहे.

Jharkhand Accident News : झारखंडमधील (Jharkhand) देवघरमध्ये (Deoghar) मंगळवारी सकाळी भीषण अपघात (Accident News) झाला आहे. बस आणि ट्रकमध्ये जोरदार धडक झाली. यात 18 भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तसेच अनेक प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. हंसडीहा रस्त्यावरील मोहनपूर प्रखंडाच्या जमुनिया चौकाजवळ बस आणि ट्रकमध्ये धडक झाली. धडक इतकी जोरदार होती की बसचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस आणि प्रशासनाच्या टीम देखील घटनास्थळी पोहोचल्या आहेत. सध्या मदत आणि बचावकार्य सुरू आहे. बाबा बैद्यनाथ मंदिरात पूजा करण्यासाठी कावडियांनी भरलेली बस जात होती.
चालकाला झोप लागल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. सदरचे एसडीओ रवी कुमार म्हणाले की, पहाटे 4 ते 5 च्या दरम्यान आम्हाला माहिती मिळाली की, देवघरहून बासुकीनाथला भाविकांना घेऊन जाणारी 32 आसनी बस नियंत्रणाबाहेर गेली आणि एका ट्रकला धडकली. त्यानंतर बस विटांना धडकली, असे त्यांनी सांगितले आहे.
मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी व्यक्त केला शोक
राज्याचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी या अपघातावर दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी 'X' या सोशल मीडिया साइटवर पोस्ट करत लिहिले की, "आज सकाळी देवघरच्या मोहनपूर ब्लॉकमधील जमुनिया चौकाजवळ बस अपघातात प्रवास करणाऱ्या भाविकांच्या मृत्यूची अत्यंत दुःखद बातमी आम्हाला मिळाली आहे. जिल्हा प्रशासन मदत आणि बचाव कार्यासोबतच जखमींना वैद्यकीय सुविधा पुरवत आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
मंत्री इरफान अन्सारी यांनी केले दुखः व्यक्त
मंत्री इरफान अन्सारी यांनीही अपघाताबद्दल दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी इंस्टाग्रामवर लिहिले की, "देवघरच्या मोहनपूरमध्ये कावड्या भरलेल्या बसचा भीषण अपघात अत्यंत हृदयद्रावक आहे. मी जिल्हा प्रशासनाला तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. जखमींवर योग्य उपचार करण्याचे आणि गंभीर प्रकरणांमध्ये उच्च केंद्रांमध्ये रेफर करण्याचे आदेश मी सिव्हिल सर्जनला दिले आहेत. देव मृतांच्या आत्म्यांना शांती देवो."
भाजप खासदार निशिकांत दुबे यांची पोस्ट
याशिवाय गोड्डा येथील भाजप खासदार निशिकांत दुबे यांनीही या अपघातावर दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी 'X' या सोशल मीडिया साइटवर पोस्ट करत लिहिले की, "माझ्या लोकसभा मतदारसंघातील देवघर येथे श्रावण महिन्यात कावड यात्रेदरम्यान बस आणि ट्रक अपघातात 18 भाविकांचा मृत्यू झाला आहे. बाबा वैद्यनाथजी त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो."
आणखी वाचा























