JEE Main 2018 चा निकाल : नांदेडचा पार्थ लटुरिया देशात तिसरा
एबीपी माझा वेब टीम | 30 Apr 2018 08:56 PM (IST)
आंध्र प्रदेशातील विजयवाडा इथे राहणाऱ्या सुरज कृष्णा या विद्यार्थ्याने देशात अव्वल क्रमांक मिळवला आहे. JEE Main ची ऑफलाईन परीक्षा 8 एप्रिल रोजी, तर ऑनलाईन परीक्षा 15 एप्रिल रोजी झाली होती.
मुंबई : जेईई मेन 2018 या परीक्षेच्या पहिल्या पेपरचा निकाल जाहीर झाला आहे. दुसऱ्या पेपरचा निकाल उद्या जाहीर होईल. आंध्र प्रदेशातील विजयवाडा इथे राहणाऱ्या सुरज कृष्णा या विद्यार्थ्याने देशात अव्वल क्रमांक मिळवला. तर नांदेडचा पार्थ लटुरिया देशात तिसरा आला आहे. पार्थचं पहिली ते दहावीपर्यंतचं शिक्षण नांदेडमध्ये झालं आहे. त्याचे आई-वडील नांदेडमध्ये डॉक्टर आहेत. अकरावी आणि बारावीसाठी तो राजस्थानमधील कोट्याला गेला होता. या परीक्षेत त्याने घवघवीत यश मिळवलं आहे. परीक्षा दिलेले विद्यार्थी jeemain.nic.in, cbseresults.nic.in आणि results.nic.in या वेबसाईटवर निकाल पाहू शकतात. JEE Main ची ऑफलाईन परीक्षा 8 एप्रिल रोजी, तर ऑनलाईन परीक्षा 15 एप्रिल रोजी झाली होती. देशभरातील 11 लाख 35 हजार 84 विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यापैकी 8 लाख 57 हजार 564 विद्यार्थ्यांनी ऑफलाईन, तर दोन लाख 16 हजार 755 विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षा दिली. या परीक्षेत एकूण 2 लाख 31 हजार 24 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सामान्य प्रवर्गात एक लाख 11 हजार 275 (कटऑफ 74), ओबीसी-एनसीएल प्रवर्गात 65 हजार 313 (कटऑफ 45), अनुसूचित जाती 34 हजार 425 (कटऑफ 29), अनुसूचित जमाती 17 हजार 256 (कटऑफ 24) आणि दिव्यांग श्रेणीतील 2 हजार 755 (कटऑफ -35) विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सीबीएसईकडून ही परीक्षा घेतली जाते. आयआयटी, एनआयटी यांसारख्या मोठ्या संस्थांमध्ये कटऑफमध्ये पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.