मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं देशात थैमान घातलं आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. कोणी आई-वडील गमावले, तर कोणी भावंड गमावलं, कोणी आजी-आजोबा, तर कोणी आपलं मुल गमावलं. कोरोनाच्या प्रादुर्भावात अनेक फ्रंट लाईन वर्कर्सनाही आपले प्राण गमवावे लागले आहेत. कोरोनाबाधितांच्या झपाट्यानं वाढणाऱ्या संख्येमुळं अनेक राज्यातही लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. टाटा स्टीलचे कर्मचारीही सलग काम करत आहेत आणि कंपनीचं उत्पादन सुरळीतपणे सुरु ठेवण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावत आहेत. अशातच अनेक कर्मचाऱ्यांनाही कोरोनानं आपल्या दाढेत ओढलं आहे.  

 

कंपनीसाठी काम करताना आपला जीव गमावलेल्या कर्मचाऱ्यांसाठी टाटा स्टील व्यवस्थापनानं एक पाऊल पुढे टाकलं आहे. टाटा स्टील व्यवस्थापनाने यासंदर्भात एक परिपत्रक जारी केलं आहे. परिपत्रकात टाटा स्टील व्यवस्थापनानं म्हटलं आहे की, "कोरोना महामारीच्या कठिण काळात टाटा स्टील आपल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. यामुळे आपण सर्वजण मिळून उत्तम भविष्य निर्माण करु शकू. टाटा स्टील सामाजिक सुरक्षेतंर्गत आपल्या कर्मचार्‍यांना मदत करण्यासाठी शक्य ती पावलं उचलून पुढाकार घेणार आहे. कंपनीत काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या उत्तम भविष्यासाठी टाटा स्टीलनं अत्यंत महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. 



 

कंपनी व्यवस्थापनानं परिपत्रकात म्हटल्यानुसार, "जर कोविड-19 मुळे एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला, तर टाटा स्टीलच्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना त्या कर्मचाऱ्यांच्या वयाच्या 60 वर्षांपर्यंत पगार मिळणार (last drawn salary) म्हणजेच, त्याला मृत्यूपूर्वीच्या महिन्यात जो पगार मिळाला तेवढा पगार वयाच्या 60 वर्षांपर्यंत कुटुंबातील वारसदाराला मिळणार आहे. तसेच त्या कर्मचाऱ्याला जर कंपनीकडून राहण्यासाठी घर मिळालं असेल तर त्याच्या कुटुंबियांना त्या कर्मचाऱ्याच्या निवृत्तीच्या वयापर्यंत त्या घरात राहता येईल, तसेच कर्मचाऱ्याच्या वारसदाराला सर्व वैद्यकीय सुविधांचा लाभही घेता येणार आहे. याव्यतिरिक्त कंपनीनं फ्रंट लाईन वर्कर्ससाठीही महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जर आपलं कर्तव्य बजावत असताना एखाद्या फ्रंटलाईन वर्करचा मृत्यू झाला तर कंपनी व्यवस्थापन पदवीपर्यंत त्यांच्या मुलांच्या अभ्यासाची संपूर्ण काळजी घेणार असून त्यांच्या शिक्षणाचा सर्व खर्च उचलणार आहे. 

 

टाटा स्टील व्यवस्थापनानं दिलेल्या माहितीनुसार, कंपनी व्यवस्थापन नेहमीच आपल्या कर्मचाऱ्यांना आणि भागधारकांच्या हितासाठी कार्यरत आहे. कोविडच्या या साथीच्या काळातही टाटा स्टील आपल्या सर्व कर्मचार्‍यांच्या आणि समाजाच्या सामाजिक कल्याणासाठी प्रयत्न करत आहे. हे ज्ञात आहे की टाटा स्टील नेहमीच आपल्या कर्मचार्‍यांच्या चांगल्या भविष्यासाठी कार्य करते. टाटा स्टील ही देशातील पहिली कंपनी आहे जी आठ तास काम, नफा-आधारित बोनस, सामाजिक सुरक्षा, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि कर्मचार्‍यांना प्रसूती रजा लागू करते. जे नंतर देशातील इतर कंपन्यांनी स्विकारलं.

 

महत्त्वाच्या इतर बातम्या :