Tata Steel कोरोनाशी जगण्याची झुंज सुरु असतानाच या लढ्यामध्ये आता प्रत्येकण आपल्या परीनं योगदान देण्यासाठी पुढे सरसावला आहे. यामध्येच रुग्णांना होणारा ऑक्सिजनचा तुटवडा पाहता टाटा उद्योगसमुहाकडून पुन्हा एकदा जबाबदारीचं पाऊल उचलण्यात आलं आहे. टाटा स्टीलकडून वैद्यकिय वापरासाठी दर दिवशी 300 टन ऑक्सिजनचा पुरवठा झारखंडसह इतरही राज्यांना केला जात आहे. 


Remdesivir | केंद्र सरकारचा मोठा निर्णय; रेमडेसिवीर आणि त्याच्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालावरील आयात कर हटवला 


कोरोनाबाधितांच्या उपचारांमध्ये आवश्यक असणाऱ्या लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा टाटा स्टीलकडून करण्यात येत आहे. 'कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी वैद्यकिय ऑक्सिजन महत्त्वाचा ठरत आहे. देशातील ही आणिबाणीची परिस्थिती पाहता, आम्ही दर दिवशी 200 ते 300 टन लिक्विड मेडिकल ऑक्सिजनचा पुरवठा राज्य शासनासह रुग्णालयांनाही पुरवत आहोत. आपण या लढाईत एकत्र आहोत आणि नक्कीच आपण ही लढाई जिंकू', असं ट्विट टाटा स्टीलकडून करण्यात आलं. 


कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक टी. वी. नरेंद्रन यांनी दिलेल्या माहितीनुसार कंपनीकडून झारखंडशिवाय उत्तर प्रदेश, बिहार, ओडिशा आणि पश्चिम बंगाल येथे ऑक्सिजन पुरवला जात आहे.






टाटा उद्योग समूहाकडून उचलण्यात आलेलं हे पाऊल पाहता सोशल मीडियावर त्यांच्या या निर्णयाची प्रशंसा केली जात आहे. समाजात किंवा देशात केव्हाही अडचणीचा काळ उभा राहतो त्यावेळी काही मंडळी हिरीरिनं पुढे येत मदतीचा हात देतात. टाटा उद्योगसमूह हे नाव त्यापैकीच एक. कोरोना काळात लॉकडाऊनमुळं अनेक कर्मचाऱ्यांना त्यांच्या नोकरीला मुकावं लागलं होतं. पण, कंपन्यांच्या या निर्णयाला देशाच्या उद्योग जगतातील एक मोठं नाव असणाऱ्या रतन टाटा यांनी मात्र धारेवर धरत त्यांना खडे बोल सुनावले होते. 


रतन टाटा हे त्यांच्या अनोख्या व्यक्तिमत्त्वासोबतच एक उत्तम उद्योजक म्हणून अनेकांच्याच आदर्शस्थानी आहेत. प्रत्येक गोष्टीचा आणि समाजातील घटकाचा चहूबाजूंनी विचार करण्याची त्यांची हीच वृत्ती टाटा उद्योगसमूह बहुविध मार्गांनी पुढे नेत आहे, असं म्हणायला हरकत नाही.