Jammu Kashmir News : जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील एका निर्माणाधीन चार लेन बोगद्याचा काही भाग कोसळल्यानं नऊ जण अडकले होते, त्यापैकी दोघांना वाचवण्यात यश आलं आहे. तर उर्वरित सात जणांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू आहे. गुरुवारी रात्री ही घटना घडली. प्रशासनाला माहिती मिळताच, तात्काळ बचावकार्य सुरु करण्यात आलं होतं. 


अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, खूनी नाल्यातील बोगद्याच्या समोरचा एक छोटासा भाग तपासणी दरम्यान कोसळला. त्यामुळे ही दुर्घटना घडली. माहिती मिळताच पोलीस आणि लष्करानं तातडीनं संयुक्त बचाव मोहीम सुरू केली. एकूण 9 जण बोगद्यात अडकले असून दोन जणांना वाचवण्यात यश आलं आहे. तर सात जण अद्याप बोगद्यात अडकले आहेत. त्यांना वाचवण्यासाठी प्रशासनाकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान, ही घटना रामबन जिल्ह्यात घडली असून यावेळी रामबनचे उपायुक्त, प्रकल्प संचालक, डीआयजी आणि एसएसपी उपस्थित होते. 



ऑडिट करणाऱ्या कंपनीचे कर्मचारी अडकले


अधिकाऱ्यांनी सांगितलं की, बचाव कार्यादरम्यान दोन जणांची सुटका करण्यात आली असून सात जण अजूनही बोगद्यात अडकले आहेत. बोगद्यात अडकलेले लोक बोगद्याचं ऑडिट करणाऱ्या कंपनीचे आहेत. बनिहालहून घटनास्थळी अनेक रुग्णवाहिका रवाना करण्यात आल्याचीही माहिती त्यांनी दिली आहे. 


रामबन जिल्ह्याचे उपायुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, रामबनच्या मेकरकोट भागात जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील खूनी नाल्यावर बांधकाम सुरू असलेल्या बोगद्याचा एक भाग कोसळला. ढिगाऱ्याखाली सहा ते सात जण गाडले गेले. दोघांना वाचवण्यात यश आलं असून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.