Jammu-Kashmir : जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात सुरक्षा दलाकडून मोठे ऑपरेशन सुरू आहे. शनिवारी अनंतनाग जिल्ह्यातील सिरहामा भागात झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तैयबाचा एक दहशतवादी कमांडर ठार झाला आहे. तर कुलगाममधील दुसऱ्या कारवाईत दहशतवादी अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले.


याबाबत माहिती देताना आयजीपी विजय कुमार यांनी सांगितले की, रेडवानी बाला कुलगाम येथील रहिवासी असलेला लष्कर-ए-तैयबाचा कमांडर निसार अहमद दार कुलगाम येथील सिरहामा येथे मारला गेला आहे. कुलगाम परिसरातील अनेक गुन्ह्यांमध्ये आणि हत्यांमध्ये त्याचा सहभाग होता. 


पोलीस आणि लष्कराच्या संयुक्त पथकाने आज सिरहामामध्ये घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली होती. या शोधमोहिमेदरम्यान, संयुक्त पथक संशयित ठिकाणी पोहोचताच लपलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला. त्यानंतर पथकानेही प्रत्यूत्तरादाखल गोळीबार केला. यात निसार ठार झाला. 


दरम्यान, लष्कराने केलेल्या दुसऱ्या कारवाईत दक्षिण काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील दमहल हांजीपोरा येथील चाकी समद गावात सुरक्षा दलांच्या संयुक्त पथक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. परंतु, यावेळी येथून  पळून जाण्यात दहशतवादी यशस्वी झाले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. 


दमहल परिसरात दहशतवादी लपून बलल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी शोध मोहीम सुरू केली. या शोधमोहिमेदरम्यान पहाटे चार वाजण्याच्या सुमारास चकमक सुरू झाली. लपून बसलेल्या  दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला आणि लष्कराच वेढा तोडण्यासाठी ग्रेनेड फेकले. त्यामुळे लपलेले दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी झाले.  


दरम्यान, या चकमकीत भारतीय लष्कराजे दोन जवान जखमी झाले आहेत. दोन्ही जवानांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha



महत्वाच्या बातम्या