Terrorist Attack: जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे आणखी एका इतर राज्यातून आलेल्या नागरिकावर हल्ला झाला आहे. पुलवामाच्या यादेर येथे दहशतवाद्यांनी एका व्यक्तीवर गोळीबार केला. सोनू शर्मा असे हल्ला झालेल्या व्यक्तीचे नाव असून तो पंजाबमधील पठाणकोटचा रहिवासी आहे. स्थानिक लोकांनी त्यांना पुलवामाच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.


सध्या जम्मू-काश्मीरमध्ये स्थानिक नसलेल्या लोकांवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहे. अलीकडेच श्रीनगरमधील ट्यूलिप गार्डनजवळ दहशतवाद्यांनी स्फोट घडवून आणला. या स्फोटात एका रिक्षाचालकाचा मृत्यू झाला. जम्मू जिल्ह्यातील नोंदणी क्रमांक असलेल्या व्हॅनच्या चालकाने पार्किंग क्षेत्राजवळ वाहनाचा मागचा दरवाजा उघडला तेव्हा हा स्फोट झाल्याचे पोलिसांनी सांगितले होते. या हल्ल्याची जबाबदारी जम्मू-काश्मीरमध्ये सक्रिय असलेल्या लष्कर-ए-तैयबाशी संलग्न असलेल्या 'द रेझिस्टन्स फ्रंट' (TRF) या संघटनेने स्वीकारली आहे. या हल्ल्यात चुंबकीय आयईडीचा वापर करण्यात आल्याचे टीआरएफने म्हटले आहे.


अलीकडच्या काळात जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी घटनांमध्ये वाढ झाली आहे. दुसरीकडे 6 एप्रिल रोजीच सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील त्राल भागात बुधवारी सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत अन्सार गजवतुल हिंद आणि लष्कर-ए-तैयबा या प्रतिबंधित दहशतवादी संघटनांचे दोन दहशतवादी मारले गेले. एका पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अन्सार गजवतुल हिंदचा सफात मुजफ्फर सोफी ऊर्फ मुआविया आणि लष्करचा उमर तेली ऊर्फ तल्हा अशी या दहशतवाद्यांची ओळख पटली आहे.


महत्त्वाच्या बातम्या: 



 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha