Jalandhar Sandeep Nangal Murder Case : आंतरराष्ट्रीय कबड्डी खेळाडू संदीप नंगल याची हत्या करण्यात आली आहे. कबड्डी सामन्यादरम्यान संदीपवर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. रुग्णालयात घेऊन जाताना संदीप नंगल याचा मृत्यू झाला. पंजाबमधील जालंधर येथील मल्लियां गावात सोमवारी ही दुर्घटना घडली. पंजाब पोलिसांनी याबाबतची माहिती दिली. संदीपवर गोळ्या झाडल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये गोळ्याच्या आवाजानंतर लोकांची धावपळ उडाल्याचेही दिसतेय. 
 
आंतरराष्ट्रीय कबड्डी खेळाडू संदीप नंगल ( Sandeep Nangal) याची सोमवारी एका सामन्यादरम्यान गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.  जालंधरमधील मल्लियां गावात सुरु असलेल्या एका कबड्डी चषकादरम्यान अज्ञात हल्लेखोरांनी संदीपवर गोळ्या झाडल्या. रिपोर्ट्सनुसार, संदीपवर 20 राऊंड फायर केल्या. यामध्ये संदीपला अनेक गोळ्या लागल्या. त्यामुळे संदीप गंभीर जखमी झाला होता. रुग्णालयात घेऊन जाताना संदीपचा मृत्यू झाला. दरम्यान, सामना सुरु असतानाच अचानक गोळ्यांची फायरिंग झाली. त्यानंतर एकच गदारोळ माजला. लोकांची धावपळ सुरु झाली. रस्ता मिळेल तिकडे लोक धावत होते. 


ग्‍लेडिएटर नावाने प्रसिद्ध होता संदीप – 
अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्यानंतर उपस्थित लोकांनी संदीपला तात्काळ रुग्णालयात नेलं. पण मोठ्या प्रमाणात रक्तश्राव होत असल्यामुळे संदीपने रस्त्यातच जीव सोडला. लहानपणापासूनच संदीपला कबड्डीची आवड होती. चाहत्यांमध्ये संदीप ग्लेडिएटर नावाने प्रसिद्ध होता. एक दशक संदीपने कबड्डीमध्ये राज्य केले आहे. संदीप पंजाबशिवाय, कॅनडा, यूएसए आणि यूकेमध्येही खेळला आहे. 


स्पर्धेदरम्यान संदीप सिंह नंगल आपल्या काही मित्रांना सोडण्यासाठी गेला होता. संदीपला एकट्याला पाहून काही अज्ञात हल्लेखोरांनी संदीपवर गोळ्या झाडल्या. त्यामध्ये संदीप गंभीर जखमी झाला. संदीपला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत, असे या स्पर्धेच्या संचालकांनी सांगितले. 


मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live