Jal Jeevan Mission : 'हर घर जल' योजना प्रमाणपत्र मिळवणारं गोवा (Goa) हे देशातील पहिले राज्य ठरलं आहे. तर, दादरा-नगर हवेली आणि दमण-दीव ठरला हर घर जल प्रमाणपत्र मिळवणारा पहिला केंद्रशासित प्रदेश ठरला आहे. या सर्व ठिकाणच्या गावातल्या ग्राम सभांनी, त्यांच्या गावांमधील सर्व घरांपर्यंत नळाद्वारे पिण्याचे स्वच्छ पाणी उपलब्ध झाले असल्याचा ठराव केला आहे. कोणतेही घर नळाने पाणी पुरवठ्यापासून वंचित राहिलेले नाही, याची खातरजमा करण्यात आली आहे.
दरम्यान, गोव्यातील, सर्व 2.63 लाख ग्रामीण घरांपर्यंत तसेच, दादरा-नगर हवेली आणि दमण-दीव या केंद्रशासित प्रदेशांमधील 85 हजार 156 गावांपर्यंत, नळाने पाणीपुरवठा करण्यात आला आहे. जल जीवन अभियान (Jal Jeevan Mission) ही भारत सरकारची पथदर्शी योजना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, 15 ऑगस्ट 2019 रोजी लाल किल्ल्यावरुन केलेल्या भाषणात या योजनेची घोषणा करण्यात आली होती. देशातील सर्व ग्रामीण घरांमध्ये, 2024 पर्यंत नळाने, पुरेशा प्रमाणात, योग्य दर्जाचा, नियमित आणि दीर्घकाळ पाणीपुरवठा करणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सहकार्यानं केंद्र सरकार ह्या योजनेची अंमलबजावणी करत आहे.
गावातील सर्व घरांमध्ये स्वच्छ आणि नियमीत पाणी पुरवठा करण्याचा उद्देश
कोरोना संकटाच्या काळात आलेले अनेक अडथळे आणि आव्हाने असतानाही, पंचायत समितीचे लोकप्रतिनिधी, पाणी समित्या, गोवा तसेच, दादरा नगर हवेली आणि दमण-दीवचे जिल्हा तसेच राज्ये/केंद्रशासित प्रदेशांतील अधिकारी, या सगळ्यांनी हे ध्येय साध्य केले. सर्व शाळा, अंगणवाडी केंद्रे, ग्रामपंचायत समित्यांसारख्या सार्वजनिक संस्था, आरोग्य केंद्रे, समुदाय केंद्रे, आश्रमशाळा, आणि सर्व सरकारी कार्यालये यांना देखील, आता नळाद्वारे पिण्याचे पाणी उपलब्ध झाले आहे. जल जीवन अभियानाच्या मार्गदर्शिकेत, प्रमाणपत्राची संपूर्ण प्रक्रिया देण्यात आली आहे. त्यानुसार, प्रत्यक्ष प्रकल्पावर काम करणारे अभियंते, या पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण झाल्याचा अहवाल ग्रामसभा बैठकीत प्रथम सादर करतो. त्यानंतर, गावकरी, ग्रामसभेत एक ठराव संमत करतात. यामध्ये गावातील सर्व घरांमध्ये, योग्य दर्जाच्या पाण्याचा नियमित पुरवठा होत असून कोणतेही घर त्यातून बाकी राहिलेले नाही. तसेच, गावातील सर्व शाळा, अंगणवाडी केंद्रे आणि इतर सार्वजनिक संस्थांच्या इमारतीतही पाण्याचा पुरवठा होत असल्याचेही सुनिश्चित केले जाते.
पाण्याची गुणवत्ता हाच या अभियानाचा महत्वाचा पैलू
गोव्यातील, सर्व 378 गावांमध्ये तसेच दादरा नगर हवेली आणि दमण-दीव इथे 96 गावांमध्ये ग्रामीण जल आणि स्वच्छता समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. जल आणि स्वच्छता समित्या 'हर घर जल' अंतर्गत सुरु करण्यात आलेल्या नळाने पाणीपुरवठा व्यवस्थेचे कार्यान्वयन, देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी सांभाळतात. या ग्रामपंचायतीच्या उपसमित्या असून, त्यांच्याकडे, पाणीवापराचे शुल्क जमा करण्याचीही जबाबदारी असते. हे शुल्क बँकेत जमा केले जाते. त्यातून, पंप व्यवस्थापकाचे मानधन आणि काही किरकोळ दुरुस्तीची कामे वेळोवेळी केली जातात. पाण्याची गुणवत्ता हा या अभियानाचा एक महत्वाचा पैलू आहे. तो दर्जा उत्तम असल्याची खातरजमा करण्यासाठी प्रत्येक गावात किमान पाच महिलांना पाण्याची गुणवत्ता तपासण्याचे प्रशिक्षण दिले जाते. आज, देशभरात, 10 लाखांपेक्षा अधिक महिलांना, पाण्याचा दर्जा तपासण्यासाठी फील्ड टेस्ट किट वापरण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. या महिलांनी आतापर्यंत, ह्या किटचा वापर करुन, पाण्याचे 57 लाखाहून अधिक नमुने तपासले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
- Nashik News : 'जल जीवन मिशनच्या कामात दिरंगाई कराल, तर याद राखा', सीईओ लीना बनसोड यांचे निर्देश
- Modi@8 : मोदी सरकारच्या या महत्वाच्या योजना नक्की जाणून घ्या; ज्यामुळं पंतप्रधान मोदी पोहोचले घराघरात...