Coronavirus Cases Today in India : देशात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. गेल्या आठवड्यात कोरोनाबाधितांची संख्या आठ हजारांपर्यंत पोहोचली होती. मात्र, या आठवड्यात पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढताना दिसत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या नव्या आकडेवारीनुसार, देशात गुरुवारी 15 हजार 754 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्या आधी बुधवारी 12 हजार 608 नव्या रुग्णांची नोंद झाली होती. एका दिवसात कोरोनाबाधितांच्या आकड्यामध्ये तब्बल 3146 रुग्णांची वाढ झाली आहे. यासोबतच देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्याही वाढली आहे. सध्या देशात 1 लाखांहून अधिक कोरोना रुग्ण आहेत.
देशात सक्रिय रुग्णांची संख्या एक लाखांवर
देशातील सक्रिय रुग्णांची संख्येत वाढ झाली आहे. आता देशात एकूण 1 लाख 1 हजार 830 कोरोना रुग्ण आहेत. तर गुरुवारी दिवसभरात कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे 31 लाख 52 हजार 882 डोस देण्यात आले आहेत. देशातील कोरोना रुग्णांचा दैनंदिन सकारात्मता दर 3.47 टक्के, तर आठवड्याचा सकारात्मता दर 3.90 टक्के आहे. तसेच देशात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.58 टक्के आहे.
मुंबईत दोन दिवसात चारपटीने वाढले रुग्ण
गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये दैनंदिन कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. बीएमसीने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी मुंबईत 1201 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. 30 जून 2022 नंतर मुंबईत आढळलेली ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. दैनंदिन रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे मुंबईतील सक्रीय रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. मुंबईत सध्या पाच हजार 712 सक्रीय रुग्ण झाले आहे. मुंबईत मागील 24 तासांत 681 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यासोबतच गुरुवारी दोन रुग्णांचा मृत्यू झालाय. दरम्यान, 30 जून रोजी मुंबईत एक हजार 265 नव्या रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर मुंबईतील दैनंदिन कोरोना रुग्णांच्या संख्येत घट पाहायला मिळाली होती. मात्र, आता पुन्हा एकदा मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.
राज्यात गुरूवारी 2246 कोरोना रुग्णांची नोंद
राज्यात गुरूवारी 2246 कोरोनाच्या नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर गुरूवारी दिवसभरात एकूण 1920 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. सहा कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू राज्यात सहा कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर हा 1.83 टक्के इतका झाला. तर आतापर्यंत राज्यामध्ये 79,18, 535 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 98.02 टक्के इतकं झालं आहे.