जयपूर : राजस्थानची राजधानी जयपूर येथील जे के लोन रुग्णालयात भीषण आग (Fire) लागल्याने मोठी खळबळ उडाली आहे. आग लागलेल्या वॉर्डात सुमारे 47 मुलांना दाखल करण्यात आले होते. अचानक लागलेल्या आगीमुळे रुग्णालयात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र अग्निशमन दलाने तासाभराच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. अग्निशमन दलाच्या जवानांनी सर्व मुलांना सुखरूप बाहेर काढले. यामुळे मोठा अनर्थ टळला. आग आटोक्यात आल्यानंतर प्रशासनाने या प्रकरणाच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समितीची स्थापन केली आहे.
जेके लोन हॉस्पिटलचे अधीक्षक डॉ. कैलाश मीना यांनी दिलेल्या माहितीनुसार, जेके लोन हॉस्पिटलच्या तिसऱ्या मजल्यावर असलेल्या लहान मुलांच्या वॉर्डमध्ये आग लागली होती. सोमवारी रात्री उशिरा अचानक वॉर्डात आग लागली. आग हळूहळू तीव्र झाल्यने संपूर्ण वॉर्ड धुराने भरला होता. रुग्णालय प्रशासनाला माहिती मिळताच अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनीही वॉर्डात दाखल असलेल्या मुलांना वाचवण्यासाठी खिडक्या उघडून धूर बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. वॉर्डात थॅलेसेमिया आणि कॅन्सरग्रस्त बालकांना दाखल करण्यात आले होते. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग विझवण्याचे काम सुरू केले.
रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनीही अग्निशमन दलाला सहकार्य केले. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसह अग्निशमन दलाच्या जवानांनी मुलांना वॉर्डातून सुखरूप बाहेर काढले आणि त्यांना दुसऱ्या वॉर्डात हलवले. धुराचे लोट जवळच्या वॉर्डात पोहोचल्याने घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. शेजारील वॉर्डातील मुलांनाही दुसऱ्या वॉर्डात हलवण्यात आले. आगीमुळे मुलांच्या नातेवाईकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे खळबळ उडाली होती.. अशा स्थितीत रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी कुटुंबीयांची समजूत घालून त्यांना आगीच्या ठिकाणाहून दूर केले आणि मुलांना सुरक्षित वॉर्डातून दुसऱ्या वॉर्डात हलवण्यात आले. एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात आली. मुलांना दुसऱ्या वॉर्डात हलवून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले.
सोबतच या प्रकरणाच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती नेमण्यात आली आहे. ही समिती 48 तासांत अहवाल सादर करेल. ज्या कंपनीने हा वॉर्ड बांधला आहे, त्या कंपनीच्या प्रतिनिधींनाही संपूर्ण यंत्रणेची फेरतपासणी करून ती पूर्ववत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यासोबतच भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी सर्व वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न रुग्णालयातील इलेक्ट्रिक आणि फायर युनिटचे ऑडिट करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
बाल चिकित्सा विभागाचे प्राध्यापक डॉ.जगदीश सिंग, अतिरिक्त अधीक्षक डॉ.मनिष शर्मा, वैद्यकीय शिक्षण अधीक्षक अभियंता नीरज जैन यांचा चौकशी समितीत समावेश आहे. त्यासोबत पीडब्ल्यूडीचे कार्यकारी अभियंता इलेक्ट्रिकल मुकेश सिंघल, राजमेसचे कार्यकारी अभियंता इलेक्ट्रिकल जितेंद्र मोहन आणि कार्यकारी अभियंता सिव्हिल एएन रावत यांचा समावेश आहे.