Twitter Founder Jack Dorsey : ट्विटरचे सह-संस्थापक आणि माजी सीईओ जॅक डोर्सी (Jack Dorsey) यांनी भारत सरकारवर (Indian Governmant) गंभीर आरोप केला आहे. शेतकरी आंदोलनादरम्यान मोदी सरकारने (Modi government) धमकी दिल्याचा दावा ट्विटरचे माजी सीईओ जॅक डोर्सी यांनी केला आहे. जॅक डोर्सी यांनी मोदी सरकारबाबत अनेक मोठे खळबळजनक दावे केले आहेत. शेतकरी आंदोलनादरम्यान सरकारवर टीका करणाऱ्यांना रोखण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे.


भारता सरकारची ट्विटरला धमकी?


भारत सरकारवर केलेल्या खळबळजनक दाव्यामुळे जॅक डोर्सी चर्चेत आले आहेत. जॅक डोर्सी यांनी एका मुलाखतीत हे गंभीर आरोप केले आहेत. जॅक डोर्सी यांनी म्हटलं आहे की, भारतातील शेतकरी आंदोलनादरम्यान भारत सरकारकडून ट्विटरला अनेक अकाऊंट्स ब्लॉक करण्याची शिफारस करण्यात आली होती. डोर्सी यांनी केलेल्या खळबळजनक दाव्यात त्यांनी सांगितलं आहे की, भारत सरकारवर टीका करणाऱ्या अनेक ट्विटर हँडल्सना ब्लॉक करण्यास वारंवार सांगण्यात आलं. 


माजी सीईओ जॅक डोर्सी यांचा खळबळजनक दावा


दरम्यान, आता विरोधकांनी हा मुद्दा उपस्थित करत मोदी सरकारवर निशाणा साधला आहेत. मात्र, अद्याप या प्रकरणी सरकारकडून कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. जॅक डोर्सी यांच्या दाव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.


जॅक डोर्सी यांची मुलाखत व्हायरल


ट्विटरचे सह-संस्थापक जॅक डोर्सी यांच्या मुलाखतीचा एक व्हिडीओ युथ काँग्रेस आणि नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (NSUI) ने शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये जॅक डोर्सी भारत सरकारबद्दल हे दावे करताना दिसत आहेत. जॅक डोर्सी यांनी 'ब्रेकिंग पॉइंट्स' या यूट्यूब (YouTube) चॅनलला दिलेल्या मुलाखतीची ही व्हिडीओ क्लिप समोर आली आहे. हा व्हिडीओ आता काँग्रेसने सोशल मीडियावर व्हायरल केली आहे.


ट्विटर बंद पाडून अधिकाऱ्यांच्या घरावर छापे टाकू भारत सरकारची धमकी : जॅक डोर्सी


ट्विटरच्या बोर्डाचा राजीनामा देणारे जॅक डोर्सी यांना यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीदरम्यान विचारण्यात आलं की, त्यांना कधी परदेशी सरकारांच्या दबावाचा सामना करावा लागला आहे का? यावेळी प्रत्युत्तरात डोर्सी यांनी भारताचा उल्लेख करत अनेक खळबळजनक दावे केले आहे. जॅक डोर्सी यांनी दावा केला की, 'भारतातील शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान, सरकारवर टीका करणाऱ्या पत्रकारांसह ट्विटर हँडल ब्लॉक करण्यासाठी अनेक शिफारसी करण्यात आल्या होत्या. भारतातील ट्विटर बंद करू किंवा तुमच्या अधिकाऱ्यांच्या घरांवर छापे टाकू, अशी धमकी यावेळी देण्यात आली.', असा आरोप डोर्सी यांनी केला आहे.


तुर्कस्ताननेही ट्विटरला धमकी दिल्याचा दावा


जॅक डोर्सी यांची ही मुलाखत गेल्या वर्षीची आहे. त्याचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे. यावेळी जॅक डोर्सी यांनी भारताशिवाय तुर्कस्तानचंही नाव घेतलं. तुर्कस्ताननेही भारताप्रमाणेच ट्विटरला धमकी दिल्याचा दावा त्यांनी केला आहे. या देशाच्या सरकारने ट्विटर बंद करण्याची धमकीही दिली होती. त्यामुळे अनेकदा सरकारसोबत न्यायालयीन लढाई झाली आणि यामध्ये ट्विटरचा विजय झाला, असं डोर्सी यांनी सांगितलं.


पाहा जॅक डोर्सी यांची 'ती' व्हायरल मुलाखत






काँग्रेसचा मोदी सरकारवर निशाणा


ट्विटरचे सह-संस्थापक डोर्सी यांच्या मुलाखतीचा व्हिडीओ शेअर करत युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बीव्ही यांनी ट्विटरवर लिहिलं आहे की, "मदर ऑफ डेमोक्रसी - अनफिल्टर्ड". जॅक डोर्सी यांनी म्हटलं आहे की, "शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान, मोदी सरकारने आमच्यावर दबाव आणला. आम्ही सांगितलं ते केलं नाही तर तुमची कार्यालये बंद करू आणि तुमच्या कर्मचार्‍यांच्या घरांवर छापे टाकू, असंही म्हटलं."


संबंधित इतर बातम्या :


Jack Dorsey : मस्क यांच्या हाती ट्विटरचं पाखरू, ट्विटरचे फाऊंडर जॅक डोर्सी काय करणार?