Ayodhya Ram Mandir : अयोध्येच्या राम मंदिरामध्ये (Ram Mandir) रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा करण्याची तारीख ठरली आहे. रामलल्लाची (Ram Lalla) पूजा आणि प्राणप्रतिष्ठेसाठी अयोध्याते जोरदार तयारी सुरु आहे. पूजेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. अद्याप या निमंत्रणावर पंतप्रधान कार्यालयाकडून कोणतंही उत्तर मिळालेलं नाही. राम मंदिर ट्रस्टने दिलेल्या माहितीनुसार, 22 जानेवारी 2024 रोजी राम मंदिरामध्ये रामलल्लाची (Ram Lala) प्राणप्रतिष्ठा केली जाईल. यासाठी सर्वतोपरी तयारी सुरु आहे. अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराचं भाविकांसाठी कधी खुलं याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
रामलल्ला प्राणप्रतिष्ठापणेची तारीख ठरली
राम मंदिरातील दर्शनाची आस असणाऱ्या सर्व भक्तांची इच्छा 22 जानेवारी 2024 रोजी पूर्ण होईल. या दिवशी भगवान रामलल्ला राम मंदिराच्या गर्भगृहामध्ये विराजमान होतील. अयोध्येसाठी हा फार मोठा उत्सव असेल. देशभरातील काही ठिकाणी हा कार्यक्रम व्हर्चुअली दाखवला जाईल. देशभरातील रामभक्त या दिवसाकडे डोळे लावून बसले आहेत. रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसोबतच या दिवशी विविध विधी आणि पूजा करण्यात येईल.
पंतप्रधान मोदी यांना पूजेसाठी निमंत्रण
राम मंदिर ट्रस्टने रामल्लाच्या प्राणप्रतिष्ठेबाबत पंतप्रधान मोदींना निमंत्रण पाठवलं होतं, ज्याला अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. जानेवारी महिन्यातपार पडणाऱ्या या सोहळ्यासाठी राम मंदिर ट्रस्टची तयारी सुरु झाली आहे. कार्यक्रमाचं नियोजन करण्यासाठी तसेच भक्तांची अलोट गर्दीचं व्यवस्थापन करण्यासाठी विविध योजना राबवण्यावर विचारविनिमय सुरु आहे.
राम मंदिर उभारणीचं काम कितपत पूर्ण?
राम मंदिरातील रामलल्लाच्या गर्भगृहाच्या वरच्या भागात बांधकाम सुरू आहे. ऑक्टोबर 2023 पर्यंत, राम मंदिराचा पहिला मजला तयार होईल आणि 24 जानेवारी 2024 रोजी रामल्लाला अभिषेक केला जाईल. हा कार्यक्रम सुमारे सात दिवस चालणार आहे. त्यानंतर रामभक्त रामलल्लाची विधिवत प्राणप्रतिष्ठा केली जाईल. रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या पूजेचं निमंत्रण राम मंदिर ट्रस्टच्या वतीने पंतप्रधान मोदींना पाठवण्यात आलं आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून अद्याप कोणतेही उत्तर आलेले नसले तरी कधीही त्यांचं उत्तर येऊ शकतं.
राम मंदिर केव्हा खुलं होणार?
अयोध्येच्या राम मंदिराचं काम वगाने सुरु आहे. 30 डिसेंबर 2023 पर्यंत राम मंदिराचा पहिला टप्पा पूर्ण होणार असल्याची माहिती, बांधकाम समितीच्या अध्यक्षांनी दिली आहे. मंदिराची निर्मिती तीन टप्प्यात करण्यात येणार आहे. पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर भक्तांना राम लल्लाच्या दर्शनासाठी मंदिराती प्रवेश मिळणार आहे. एएनआय या वृत्त संस्थेला माहिती देताना मिश्रा म्हणाले, पहिल्या टप्प्यात ग्राउंड फ्लोअरचे पाच मांडव पूर्ण करण्यात येणार आहे.