नवी दिल्ली : नोटाबंदीपूर्वी 1 एप्रिल 2016 ते 8 नोव्हेंबर 2016 या काळात बँकेत बचत खात्यांमध्ये (सेव्हिंग अकाऊंट) किती रक्कम जमा झाली, याची माहिती आयकर विभागाने बँकांकडून मागवली आहे.
ज्या बँक ग्राहकांनी अद्याप पॅन कार्ड खात्याशी जोडलेलं नाही, त्यांनाही याबाबत विचारणा करण्याची सूचना आयकर विभागाने बँकांना केली आहे. ज्या ग्राहकांनी पॅन क्रमांक बँक खात्याशी जोडलेलं नसेल, त्यांना यावर्षी 28 फेब्रुवारीपर्यंत पॅन क्रमांक किंवा फॉर्म-60 बँकेत द्यावा लागणार आहे. यासंबंधीत आदेशच आयकर विभागाने काढलाय.
सर्व खातेधारकांना पॅन कार्ड बंधनकारक
आयकर विभागाच्या 114B या कायद्यानुसार बँकेतील सर्व व्यवहारांसाठी पॅन कार्ड बंधनकारक आहे. त्यामुळे बँकांनाही आता ग्राहकांकडून फॉर्म-60 डिक्लेरेशन किंवा पॅन क्रमांक घेणं बंधनकारक असेल.
ज्या ग्राहकांनी खातं उघडताना पॅन क्रमांक किंवा फॉर्म-60 दिला नसेल त्यांना 28 फेब्रुवारीची मुदत देण्यात आली आहे. फॉर्म-60 हा एक डिक्लेरेशन फॉर्म असून त्यामध्ये विनापॅन ग्राहकाच्या तपशीलाचा समावेश असतो.
दरम्यान नोटाबंदीनंतर बचत खात्यात (सेव्हिंग अकाऊंट) अडीच लाखांपेक्षा जास्त, आणि चालू खात्यात (करंट अकाऊंट) साडे 12 लाखांपेक्षा जमा केलेल्या रकमेचा तपशीलही आयकर विभागाने बँक आणि पोस्ट ऑफिसकडून मागवला आहे. शिवाय एका दिवसात 50 हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम केलेल्या ग्राहकाची माहितीही द्यावी लागेल.