एप्रिलच्या सुमारास आयफोन 8 चं भारतातील मॅन्युफॅक्चरिंग सुरु होण्याची चिन्हं आहेत. याबाबत अद्याप चर्चा असून अॅपल कंपनीकडून कोणतीही अधिकृत माहिती नाही. मात्र सुरुवातीच्या काळात अॅपलची मोजकी गॅजेट्स बंगळुरुत तयार होतील, त्यानंतर हळूहळू प्रॉडक्शनचा विस्तार होईल, असा अंदाज आहे.
सध्याच्या घडीला आयात कर आणि जकात म्हणून अॅपल भारतात मॅन्युफॅक्चरिंग आणि प्रॉडक्शन खर्चाच्या 12 टक्के रक्कम भरते. या रकमेमुळे भारतात विकल्या जाणाऱ्या आयफोनच्या किंवा एकंदरित अॅपल डिव्हाईसेसच्या किमतीत वाढ होते. त्यामुळे इतर कंपनींच्या उत्पादनांच्या तुलनेत अॅपलची उत्पादनं महाग ठरतात.
भारतातच या उत्पादनांची निर्मिती झाल्यास अतिरिक्त खर्च निघून जाईल. त्यामुळे साहजिकच आयफोनच्या किमतीत घट होईल. स्थानिक अधिकृत आयफोन सेंटरमधूनच ग्राहकांना उत्तम सेवा आणि रिपेअरिंग सर्व्हिस मिळण्याची शक्यताही अधिक आहे.