'इस्रो'च्या आठव्या नेव्हिगेशन सॅटेलाईटचं प्रक्षेपण अयशस्वी
एबीपी माझा वेब टीम | 31 Aug 2017 11:39 PM (IST)
श्रीहरीकोटा येथील तळावरून संध्याकाळी सात वाजता पीएसएलव्ही सी-39 या प्रक्षेपकाच्या सहाय्याने हा उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला
फाईल फोटो
श्रीहरीकोटा : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोकडून प्रक्षेपित करण्यात आलेल्या ‘IRNSS 1H’ उपग्रहाचं प्रक्षेपण अखेरच्या टप्प्यात अयशस्वी ठरलं. ‘इस्रो’चे अध्यक्ष किरण कुमार यांनी पत्रकार परिषदेत याबद्दलची माहिती दिली. श्रीहरीकोटा येथील तळावरून संध्याकाळी सात वाजता पीएसएलव्ही सी-39 या प्रक्षेपकाच्या सहाय्याने हा उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला. मात्र उड्डाणाचे सुरूवातीचे टप्पे यशस्वीपणे पार पडल्यानंतर चौथ्या टप्प्यात अंतराळात प्रवेश करताना उपग्रहाभोवतीचे ‘हिट शिल्ड’चं आवरण वेगळं होणं अपेक्षित होते. मात्र, तस न झाल्यामुळे प्रक्षेपकाच्या अंतर्गत भागापासून विलग होऊनही उपग्रह आतमध्येच अडकून राहिला. या 1400 किलोहून अधिक वजनाच्या उपग्रहाची निर्मिती ‘इस्रो’सह 6 अन्य छोट्या ( वैज्ञानिक) खाजगी संस्थांनी केली आहे. यामध्ये खाजगी संस्थांचं योगदान 25 टक्के आहे. हा उपग्रह लोकेशन बेस्ड सर्व्हिसेस, जसं की रेल्वेंचं सर्वेक्षण आणि ट्रॅकिंग यांसाठी महत्त्वाचा असेल. तर मासेमारी क्षेत्रासाठीही हा उपग्रह महत्त्वाचा ठरणार आहे. या उपग्रहाच्या प्रक्षेपणानंतर भारतही आपला नेव्हिगेशन सिस्टम तयार करणाऱ्या देशांच्या यादीत गणला जाईल. याआधी अमेरिका, रशिया, युरोप, चीन आणि जपान या देशांची स्वतःची नेव्हिगेशन सिस्टम आहे. अमेरिकेची ग्लोबल पोजिशनिंग सिस्टम, रशियाची ग्लोनास, यूरोपची गॅलीलियो, चीनची बेदोऊ आणि जपानची कवासी जेनिथ सॅटेलाईट सिस्टम आहे.