नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा म्हणजे नोटाबंदीचा निर्णय घेतला. नोटाबंदीच्या घोषणेनंतर या सर्व जुन्या नोटा रिझर्व्ह बँकेत जमा करण्यात आल्या.


रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नोटाबंदीनंतर पहिल्यांदाच किती पैसा जमा झाला, याची आकडेवारी जाहीर केली आहे. नोटाबंदीपूर्वी चलनात असलेल्या 15.44 लाख कोटी रुपयांपैकी 15.28 लाख कोटी रुपये बँकेत जमा झाले. तर 1000 च्या जवळपास 99 टक्के नोटा बँकेत परत आल्या, अशी माहिती आरबीआयने दिली. आरबीआयने वार्षिक आर्थिक अहवालात ही माहिती दिली.

आरबीआयने जाहीर केलेल्या या आकडेवारीनंतर देशातील राजकारण तापलं आहे. नोटाबंदीचा जो उद्देश होता, तो साध्य झाला नाही, असा आरोप विरोधक करत आहेत. तर नोटाबंदीचा उद्देश साध्य झाल्याचा दावा सरकारकडून केला जात आहे.

नोटाबंदीची आकडेवारी

  • एक हजार रुपयांच्या नोटेमध्ये केवळ 8 हजार 900 कोटी रुपये म्हणजे 8.9 कोटी नोटा बँकेत परतल्या नाही.

  • 500 रुपयांच्या जुन्या नोटेमध्ये 7 हजार 100 कोटी रुपये परत आले नाही आणि उर्वरित नोटा बनावट आणि फाटलेल्या होत्या.

  • एकूण 16 हजार कोटी रुपये परत आले नाही.

  • 2016-17 या वर्षात नोटा छपाईचा खर्च 7 हजार 965 कोटी रुपये झाला आहे, जो 2015-16 या वर्षात 3 हजार 421 कोटी रुपये एवढा होता.

  • 2016-17 दरम्यान बनावट नोटांची संख्या 6 लाख 32 हजार 962 वरुन 7 लाख 62 हजार 72 एवढी झाली आहे. म्हणजे नोटाबंदीनंतर 41 कोटी रुपयांच्या बनावट नोटा चलनात आल्या.


सरकारचे दावे काय होते?

  • नोटाबंदीमुळे काळा पैसा, भ्रष्टाचार, दहशतवाद, नक्षलवाद आणि बनावट नोटा यांना आळा बसेल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर रोजी दिलेल्या भाषणात म्हटलं होतं.

  • नोटाबंदीमुळे 10 ते 11 लाख कोटी रुपये परत येतील. म्हणजे 5 लाख कोटी रुपयांपर्यंतचा काळा पैसा बँकेत परतणार नाही, असा दावा सुप्रीम कोर्टात एका सुनावणीवेळी सरकारकडून करण्यात आला होता.

  • नोटाबंदीमुळे 3 लाख कोटी रुपये (काळा पैसा) बँकेत जमा झाले. तर 1.75 कोटी रुपयांची रक्कम चौकशीच्या घेऱ्यात आहे, असं मोदींनी 15 ऑगस्ट 2017 रोजी लाल किल्ल्यावरुन दिलेल्या भाषणात म्हटलं होतं.


नोटाबंदीमुळे काय नुकसान?

  • नोटाबंदीनंतर पहिल्या तिमाहीत देशाचा विकास दर 6.1 टक्क्यांवर घसरला, जो 2014 नंतरचा सर्वात कमी आकडा होता. कारण बाजारात चलनाचा तुटवडा होता.

  • रिअल इस्टेट, उद्योग यांसारख्या क्षेत्रांना फटका बसला. हजारो जणांना बेरोजगार होण्याची वेळ आली.


विरोधकांचा आरोप

नोटाबंदीची संकल्पना ज्याची होती, त्याला नोबेल पुरस्कार दिला पाहिजे, अशी टीका काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी केली. नोटाबंदीमुळे 16 हजार आले नाही म्हणजे ते कमावले. पण दुसरीकडे नव्या नोटा छापण्यासाठी 21 हजार कोटी रुपये खर्च केले. पंतप्रधान मोदींनी देशाची माफी मागावी, अशी मागणी चिदंबरम यांनी केली.

सामान्य प्रश्न : त्या मृत्यूंना जबाबदार कोण?

नोटाबंदीच्या काळात 104 जणांचा मृत्यू झाला. बनावट नोटाही हद्दपार झाल्या नाही. भ्रष्टाचार आणि दहशतवादही थांबला नाही, मग या सर्वांना जबाबदार कोण?

संबंधित बातम्या :

नोटाबंदी : 15.44 लाख कोटींपैकी 15.28 लाख कोटी रुपये बँकेत जमा!


नोटाबंदीचा हेतू साध्य, आकडेवारीनंतर जेटलींचा दावा