मुंबई : आज भारतासाठी अभिमानाचा दिवस आहे. मात्र, आज हा अभिमानाचा दिवस आणण्यासाठी अनेकांची मेहनत, त्याग आहे. इस्रोची स्थापना 1962 मध्ये झाली होती. त्यावेळी भारताच्या अंतराळ संशोधनाच्या कार्यक्रमाला 'भारतीय अंतराळ संशोधन समिती' (INCOSPAR) असे म्हटले जात असे. डॉ. विक्रम साराभाई हे त्याचे प्रमुख होते. त्यावेळी डॉ. साराभाईंकडे मोजक्या शास्त्रज्ञांची टीम होती. फारसं आर्थिक पाठबळदेखील नव्हते.


INCOSPAR च्या स्थापनेच्या एका वर्षानंतर भारताने पहिले रॉकेट प्रक्षेपित केले. त्याचे भाग सायकलवर लोड करून प्रक्षेपण केंद्रापर्यंत पोहोचवले गेले. ते चित्र ऐतिहासिक होते. पाच दशकांनंतर, आपण चंद्र, मंगळ मोहिमा आखल्या जात आहे.. इस्रोची ही यशोगाथा ही भारताच्या अंतराळ संशोधनाच्या प्रगतीची गोष्ट आहे. 


गोष्ट पहिल्या रॉकेट लाँचिंगची...


डॉ. विक्रम साराभाई यांनी 1962 मध्ये इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च (INCOSPAR) ची स्थापना केली. डॉ. साराभाई यांच्या नेतृत्वाखाली, INCOSPAR ने तिरुवनंतपुरम येथे थुंबा इक्वेटोरियल रॉकेट लॉन्चिंग स्टेशन (TERLS) ची स्थापना केली. INCOSPAR च्या स्थापनेच्या एका वर्षानंतर 1963 मध्ये भारताने अंतराळात पहिल्या रॉकेटचे प्रक्षेपण केले होते. वातावरणातील हवेचा अभ्यास करण्यासाठी साऊडिंग रॉकेटला थुंबा इक्वेटोरियल रॉकेट लाँचिंग स्टेशनवरून प्रक्षेपित करण्यात आले. सध्या हे केंद्र विक्रम साराभाई अंतराळ केंद्र म्हणून ओळखले जाते.  


INCOSPAR ची सुरुवात करण्यासाठी एका स्थानिक चर्चकडून जमीन घेण्यात आली होती. त्याशिवाय, स्थानिक ग्रामस्थांचे स्थलांतर करण्यात आले. रॉकेटच्या सुट्ट्या भागांना सायकलवरून लाँचिंग पॅडवर नेण्यात आले होते. 21 नोव्हेंबर 1963 रोजी डॉ. होमी भाभा यांच्या उपस्थितीमध्ये रॉकेट लाँच करण्यात आले. 


आर्यभट्ट...पहिल्या उपग्रहाचे प्रक्षेपण


आर्यभट्ट हा भारताचा पहिला उपग्रह 19 एप्रिल 1975 रोजी प्रक्षेपित करण्यात आला. कॉस्मोस-3 एम लाँच व्हेईकलमधून हा भारताचा पहिला उपग्रह लाँच करण्यात आला. आर्यभट्ट हे भारताचे खगोल अभ्यासक होते. हा उपग्रह इस्रोने तयार केला होता आणि सोव्हिएत महासंघाने लाँच केला होता. 


SLV-3: इस्रोने तयार केले पहिले स्वदेशी रॉकेट


सॅटेलाइट लाँच व्हेईकल-3 (SLV-3) हा भारताचा पहिला एक्सपेरिंमेंटल सॅटलाइट लाँच व्हेईकल होते. हा 40 किलोच्या श्रेणीतील पेलोडला Low Earth Orbit (LEO) मध्ये ठेवण्यास सक्षम होता. 18 जुलै 1980 मध्ये एसएलव्ही-3 ने  रोहिणी  उपग्रहाला पृथ्वीच्या कक्षेत स्थापित केले.अशा प्रकारे भारत हा अंतराळ संशोधनात प्रगत असलेल्या देशांच्या रांगेतील सहावा देश झाला. 'रोहिणी' ही इस्रोद्वारे लाँच करण्यात आलेली उपग्रहांची एक मालिका होती. यामध्ये चार सॅटेलाइटचा समावेश होता.  त्यातील तीन उपग्रहांनी यशस्वीपणे पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश केला. 


PSLV...अंतराळ मोहिमेतील इस्रोचा विश्वासू सोबती...


पोलर सॅटेलाइट लाँच व्हेईकल (PSLV) हा भारताच्या तिसऱ्या पिढीतील लाँच व्हेईकल आहे. ऑक्टोबर 1994 मध्ये याला लाँच करण्यात आले. त्यानंतर जून 2017 पर्यंत सलग 39 यशस्वी मोहिमा पीएसएलव्हीच्या मदतीने करण्यात आल्या. इस्रोसाठी हा विश्वासू लाँच व्हेईकल आहे. 2008 मध्ये पार पडलेली चांद्रयान-1 मोहीम आणि 2013 मध्ये मंगळ ऑर्बिटर स्पेसक्राफ्टला यशस्वीपणे लाँच केले. 


GSLV 


इस्रोचा आणखी एक महत्त्वाचे संशोधन म्हणजे जिओसिंक्रोनस सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल (GSLV). GSLV मध्ये PSLV पेक्षा जास्त वजनदार पेलोड्स वाहून नेण्याची क्षमता आहे.


चांद्रयान -1 


चांद्रयान-1 ही भारताची पहिली चंद्र मोहीम होती. ते ऑक्टोबर 2008 मध्ये लाँच करण्यात आले. याने चंद्राभोवती 3400 हून अधिक फेऱ्या मारल्या.  29 ऑगस्ट 2009 रोजी अंतराळयानाशी संपर्क तुटल्यानंतर ही मोहीम संपली असल्याचे जाहीर करण्यात आले. 


मंगळयान...पहिल्याच प्रयत्नात इस्रोने रचला इतिहास


मंगळयान मोहीम ही कोणत्याही ग्रहावर अंतराळयान पाठवणारी भारताची पहिली मोहीम होती. Roscosmos, NASA आणि युरोपियन स्पेस एजन्सी नंतर मंगळाच्या कक्षेत पोहोचणारी इस्रो ही जगातील चौथी अंतराळ संस्था बनली आहे. पहिल्याच प्रयत्नात मंगळाच्या कक्षेत पोहोचणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला. मंगळयान 5 नोव्हेंबर 2013 रोजी प्रक्षेपित करण्यात आले.


चांद्रयान - 2 अखरेच्या क्षणी अपयश


2019 मध्ये इस्रोने चांद्रयान-2 ही मोहीम लाँच केली होती. चांद्रयान-2 चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार होते. मात्र, अखेरच्या क्षणी विक्रम लँडरशी संपर्क तुटला. चांद्रयान-2 चा  47 दिवसांचा प्रवास शेवटच्या क्षणी अपयशी ठरला.