RLV TD Landing Experiment : अंतराळात भारताची ताकद आणखी वाढणार आहे. त्यामुळे अंतराळ मोहिमांचा खर्च कमी होईल. बहुप्रतिक्षित स्पेस शटल 'रीयूजेबल लॉन्च व्हेईकल' (RLV-TD) हे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (ISRO) दिशेने लँडिंग  (LEX) होणार आहे. आरएलव्हीचा लँडिंग प्रयोग येत्या शनिवारी ( 28 जानेवारी) होणार असल्याची माहिती इस्रोचे अध्यक्ष डॉ. एस. सोमनाथ यांनी दिली. 


मिळालेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टरच्या मदतीने आरएलव्हीला चार किलोमीटरपर्यंत उंचीवर नेले जाईल आणि त्यानंतर तेथून ते लँडिंगसाठी खाली सोडले जाईल. यानंतर हे यान स्वतः गाईड करेल आणि त्यासाठी निश्चित केलेल्या एअरफील्डच्या धावपट्टीकडे नेव्हिगेट होत-होत खाली उतरते. लँडिंगसाठी कर्नाटकातील चल्लाकेरे येथील संरक्षण धावपट्टीची निवड करण्यात आली आहे.


RLV विशेष का आहे?


रीयुजेबल लॉन्च व्हेईकल (पुन्हा वापरण्यायोग्य वाहन), हे ऑर्बिटल री-एंट्री व्हेईकल (ओआरव्ही) (पृथ्वीच्या कक्षेत पुन्हा प्रवेश करण्यासाठी वाहन) आहे. ते पूर्णपणे स्वदेशी आहे. या यानाच्या सर्व चाचण्या यशस्वी झाल्यास ते उपग्रह सोडण्यात आणि शत्रूच्या उपग्रहांना लक्ष्य करून नष्ट करण्यास सक्षम असेल, अशी माहिती इस्त्रोच्या अधिकाऱ्यांनी दिली.   


या यानाद्वारे डायरेक्टेड एनर्जी वेपन (DEW) (ऊर्जेच्या किरणाने लक्ष्य भेदणारी शस्त्रे) चालवता येतात. हे यान हे काम अवकाशातून करू शकणार आहे. म्हणजेच शत्रूंना धडकी भरवण्याचं सामर्थ्य या यानात आहे. या यानाची चाचणी यशस्वी झाली तर युद्धाच्या पद्धतीत बदल होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. इस्रोने 2030 पर्यंत RLV प्रकल्प यशस्वी करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.


अंतराळ मोहिमेचा खर्च कसा वाचणार?


सध्या उपग्रह प्रक्षेपणासाठी रॉकेटचा वापर केला जातो. त्यासाठी मोठा खर्च आहे. RLV अशा प्रकारे तयार केले जात आहे की ते उपग्रहाला अवकाशात घेऊन जाऊ शकते आणि तिथून सुरक्षितपणे परत येऊ शकतो. त्यानंतर पुढील मोहिमेसाठी देखील त्याचा वापर होऊ शकतो. यामुळे उपग्रह प्रक्षेपणाचा खर्च 10 टक्क्यांनी कमी होईल, असा विश्वास अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.  


स्पेस शटल कोणत्या देशांमध्ये आहे?


अमेरिका, रशिया, चीन आणि फ्रान्स या देशांकडे हे स्पेस शटल असल्याचे सांगितले जाते. रशियाने 1989 साली असे स्पेस शटल बनवले होते. पण असे म्हणतात की त्याने एकदाच उड्डाण केले. भारतात तयार होत असलेले स्पेस शटल सध्या वापरासाठी प्रस्तावित आकारापेक्षा सहा पटीने लहान बनवले आहे.  


RLV ची पहिली चाचणी कशी झाली?


मे 2016 मध्ये प्रथमच RLV ला रॉकेटमध्ये जोडून हायपरसॉनिक (ध्वनी वेगाच्या पाचपट) उड्डाण करण्यासाठी बनवले गेले. त्यानंतर ते 65 किलोमीटर उंचीवर गेले आणि बंगालच्या उपसागरात उतरले. त्याच्या साडेसहा मीटर लांबीच्या आवृत्तीचे वजन 1.75 टन आहे. सध्या  RLV हे टू स्टेज टू ऑर्बिट (TSTO) संकल्पना वाहन आहे.