मुंबई: आजचा दिवस जगाच्या इतिहासामध्ये सर्वात महत्त्वाच्या दिवसांपैकी एक आहे. इस्त्रायल आणि हमासमध्ये युद्ध (Israel Hamas War) सुरू असून त्यामध्ये सामान्य जनता होरपळली जात आहे. या वादाचे मूळ असलेला बाल्फोर जाहीरनामा (Balfour Declaration) हा आजच्या दिवशी म्हणजे 2 नोव्हेंबर 1917 रोजी प्रसिद्ध करण्यात आला. याच जाहीरनाम्याच्या माध्यमातून ब्रिटिशांनी पॅलेस्टिन अरबांची जमीन ज्यू लोकांना देण्याचं जाहीर केलं. त्यानंतर दुसऱ्या महायुद्धानंतर हा जाहीरनामा प्रत्यक्षात आला आणि 1948 साली इस्त्रायल या देशाची निर्मिती झाली. केवळ 67 शब्दांच्या असलेल्या या जाहीरनाम्याने जगाचा इतिहासच नव्हे तर भूगोलही बदलला. तसेच आजच्याच दिवशी बॉलिवूडचा किंग खान शाहरूखचा जन्मदिनही (Shah Rukh Khan Birth) आहे. 


1834 : भारतीय मजुरांचे अॅटलस जहाज मॉरिशसला पोहोचले


भारतीय मजुरांना घेऊन जाणारे अॅटलस जहाज 2 नोव्हेंबर 1834 रोजी मॉरिशसला पोहोचले. या दिनाच्या प्रित्यर्थ 2 नोव्हेंबर हा दिवस मॉरिशसमध्ये 'प्रवासी दिन' म्हणून साजरा केला जातो. आज मॉरिशस जो काही आहे त्याचे मोठे श्रेय तिथे गेलेल्या भारतीय मजुरांना दिले जाते. त्यांनी आपल्या मेहनतीने या देशाला नवी ओळख दिली आहे. 1834 ते 1924 या काळात ब्रिटिशांनी भारतातून अनेक मजूर मॉरिशसला नेले.  


1917 : ब्रिटनने बाल्फोर घोषणापत्र जारी केले


पॅलेस्टाईनच्या (Palestine) भूमीत ज्यू लोकांच्या इस्त्रायल (Isreal) या देशाला मान्यता देणाऱ्या बाल्फोर डिक्लेरेशन (Balfour Declaration) म्हणजे बाल्फोर जाहीरनाम्याची घोषणा 2 नोव्हेंबर 1917 रोजी करण्यात आली. 29 सप्टेंबर 1923 रोजी लिग ऑफ नेशन्सने या कराराला मान्यता दिली होती. त्यानंतर ब्रिटनचे तत्कालीन परराष्ट्र सचिव सर ऑर्थर बाल्फोर यांनी हा जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्यांच्या नावानेच या जाहीरनाम्याला बाल्फोर डिक्लेरेशन म्हटलं गेलं. 


केवळ 67 शब्दाच्या बाल्फोर जाहीरनाम्याने जगाचा इतिहास आणि भूगोल बदलला. या जाहीरनाम्यामुळे अरब देशांमध्ये एक प्रकारचा असंतोष पसरला. अरब आणि इस्त्रायल यांच्या वादाचा आरंभबिंदू म्हणून या जाहीरनाम्याकडे पाहिलं जातं. नंतरच्या काळात, 1948 रोजी इस्त्रायल देश अस्तित्वात आल्यानंतर हा वाद आणखीनच वाढला. 


1936 : BBC ते पहिले चॅनेल सुरू


ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनने (BBC) अधिकृतपणे त्यांचे पहिले चॅनेल लॉन्च केले. बीबीसीची जगातील पहिली नियमित दूरदर्शन सेवा देण्यास 2 नोव्हेंबर 1936 पासून सुरूवात झाली.  BBC चे मुख्यालय लंडन येथे आहे.  हा जगातील सर्वात जुना राष्ट्रीय माध्यम समूह आहे. 18 ऑक्टोबर 1922 रोजी लंडनमध्ये याची औपचारिक स्थापना झाली. 14 नोव्हेंबर 1922 रोजी बीबीसीने आपली पहिली रेडिओ सेवा सुरू केली होती.


1950 : लेखक जॉर्ज बर्नार्ड शॉ यांचे  निधन  


जॉर्ज बर्नार्ड शॉ (George Bernard Shaw)हे नोबेल पारितोषिक विजेते लेखक होते. जॉर्ज बर्नार्ड शॉ यांचा जन्म 26 जुलै 1856 रोजी डब्लिन येथे झाला. तर  2 नोव्हेंबर 1950 रोजी वयाच्या 94 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. आर्म्स अँड द मॅन हे त्यांचे प्रसिद्ध नाटक आहे.


1976 : जिमी कार्टर अमेरिकेचे 39 वे राष्ट्राध्यक्ष 


जिमी कार्टर यांनी 2 नोव्हेंबर 1976 रोजी अमेरिकेचे 39 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. ते 1976 ते 1980 पर्यंत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी होते. अध्यक्ष होण्यापूर्वी त्यांनी युनायटेड स्टेट्स नेव्हीमध्ये नोकरी केली. शिवाय जॉर्जियामध्ये सिनेटर म्हणून काम केले. राष्ट्राध्यक्षपदानंतर ते मानवाधिकार संघटना आणि परोपकारी संस्थांशी जोडले गेले. त्यांना 2002 मध्ये शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला होता.  


1965 : किंग खान शाहरुख खानचा जन्मदिन (Shah Rukh Khan Birth)


बॉलिवूडचा किंग खान अशी ओळख असलेल्या शाहरूख खानचा जन्म 2 नोव्हेंबर 1965 रोजी झाला. दिल्लीत जन्मलेला शाहरुखने टेलिव्हिजनवरील मालिकांमधून अभिनयाचा प्रवास सुरू केला. दिवाना या चित्रपटाच्या माध्यमातून त्याने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 'डर', 'अंजाम' आणि 'बाजीगर' सारख्या काही चित्रपटांमध्ये नकारात्मक भूमिका केल्या.


'राजू बन गया जंटलमन', फिर भी दिल है हिंदुस्तानी', 'डुप्लिकेट' किंवा 'देवदास', 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे', 'माय नेम इज खान' आणि 'चक दे' सारख्या चित्रपटांमधूल शाहरूख घराघरात पोहोचला. शाहरुख खानने 'रईस' आणि 'डॉन' सारख्या चित्रपटात गँगस्टरची भूमिका साकारली. शाहरुख खान तीन दशकांहून अधिक काळ बॉलिवूडमध्ये असून हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे.   



ही बातमी वाचा: