इम्फाळ : गेल्या 16 वर्षांपासून सुरु ठेवलेलं उपोषण मणिपूरच्या 'आयर्न लेडी' इरोम शर्मिला यांनी अखेर सोडलं आहे. प्रदीर्घ कालावधीनंतर उपोषण सोडताना मानवाधिकार कार्यकर्त्या इरोम शर्मिला भावुक झाल्या होत्या. यावेळी त्यांनी मणिपूरच्या मुख्यमंत्री होण्याची इच्छा बोलून दाखवली. बोटावर मध चाटून त्यांनी उपोषणाचा त्याग केला.

 
मणिपूरमधील 'आर्म्ड फोर्स स्पेशल पॉवर अॅक्ट' (अफ्स्पा) म्हणजेच सशस्त्र दल विशेषाधिकार कायदा रद्द करण्यासाठी त्यांनी 2000 सालापासून उपोषण सुरु केलं होतं. त्यांना जिवंत ठेवण्यासाठी नलिकेच्या मदतीनं जबरदस्ती लिक्विड डाएट दिलं जात होतं. उपोषणास्र मागे घेतलं असलं तरी शर्मिला इरोम या कायद्याविरोधातील लढा आता राजकीय पातळीवर लढणार आहेत.

 

 

कोण आहेत इरोम शर्मिला?

 

 

शर्मिला यांना आयर्न लेडी म्हणून ओळखलं जातं. शस्त्र दल विशेष शक्ती कायदा रद्द करण्यासाठी गेल्या 16 वर्षांपासून त्यांचं उपोषण सुरु आहे. या काळात त्यांना अनेकदा अटक करण्यात आली. शिवाय त्यांना जबरदस्ती अन्न देण्याचाही प्रयत्न करण्यात आला.

 

 

शर्मिला यांनी 2014 साली दिल्लीतील जंतर मंतरवर आमरण उपोषणाची घोषणा केली. मात्र त्यांच्यावर आत्महत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. गेल्या 16 वर्षांपासून आपण ज्या गोष्टीसाठी लढत आहोत, त्यासाठी लोकांचा पाठिंबा कमी झाला असल्याची खंत शर्मिला यांना आहे.

 

 

उपोषण सोडल्यानंतर शर्मिला राजकारणाच्या मैदानात उतरणार असल्याचं सांगितलं जात आहे. मणिपूरमधील राजकीय वर्तुळात यामुळे जोरदार खळबळ माजली आहे. दरम्यान उपोषणानंतर शर्मिला यांची पुढील दिशा काय असेल, याविषयी कसलीही माहिती नाही, असं शर्मिला यांच्या भावाने सांगितलं.