बंगळुरू: महाराष्ट्रात एकीकडे सत्तासंघर्षावरुन राजकीय वातावरण तापलं असतानाच शेजारच्या कर्नाटकमध्ये एक डॅशिंग महिला IPS अधिकारी आणि तडफदार महिला IAS अधिकाऱ्यामध्ये वाद सुरू आहे. आयपीएस अधिकारी डी रुपा (IPS officer D Roopa) यांनी आयएएस अधिकारी रोहिणी सिंधुरी (IAS Rohini Sindhuri) यांच्यातील वाद आता वेगळ्या वळणावर पोहोचला आहे. डी रुपा यांनी रोहिणी सिंधुरी यांच्यावर 19 आरोप केले असून त्यामध्ये दिवंगत आयएस अधिकारी डीके रवी (IAS Ravi’s Death) यांच्या आत्महत्येशी संबंधितही एक आरोप आहे. हा वाद आता इतका भडकलाय की राज्य सरकारने या दोन्ही अधिकाऱ्यांना कोणतीही पोस्टिंग न देता त्यांच्या बदल्या केल्या आहेत.
आयपीएस अधिकारी डी रूपा मुदगील (D Roopa) यांनी आयएएस अधिकारी रोहिणी सिंदुरी (Rohini Sindhuri) यांच्यावर भ्रष्टाचाराचे आणि इतर अधिकाऱ्यांना स्वतःची खासगी छायाचित्रे पाठवल्याचा आरोप केला आहे. शनिवारी, 18 फेब्रुवारी रोजी डी रूपा यांनी रोहिणी सिंधुरी यांच्यावर 19 आरोप केले. यामध्ये भूमी अभिलेख विभागातील अधिकाराचा गैरवापर, रिअल इस्टेटमधील घराणेशाही, अघोषित मालमत्ता आणि आयएएस अधिकारी डीके रवी यांच्या गूढ मृत्यूमध्ये त्यांची भूमिका अशा आरोपांचा समावेश आहे.
वरिष्ठ आयएएस अधिकारी डीके रवी यांच्या आत्महत्येमध्ये (DK Ravi Suicide Case) आयएएस अधिकारी रोहिणी सिंधुरी यांच्या भूमिकेबद्दल आयपीएस अधिकारी डी रूपा यांनी संशय व्यक्त केला होता. त्यानंतर डीके रवी यांच्या पत्नी कुसुमा हनुमंतरायप्पा (Kusuma Hanumantharayappa) यांनी त्यांच्या पतीच्या आत्महत्येबाबतच्या सीबीआयच्या अहवालात जबाबदार व्यक्तींची नावे आहेत अशी प्रतिक्रिया दिली होती.
डी रूपा यांनी लावलेल्या 19 आरोपांपैकी सिंधुरी आणि रवी यांच्या 2015 मध्ये आत्महत्येपूर्वी झालेल्या वैयक्तिक चॅटचा संदर्भ होता. सिंधुरी यांनी हे सर्व आरोप नाकारले आहेत आणि त्यांनी डी रुपा यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याचे संकेत दिले.
IPS D Roopa Vs IAS Rohini Sindhuri: फेसबुकवर शेअर केले खासगी फोटो
डी रुपा यांनी दोन दिवसांपूर्वी फेसबुकवर सिंधुरी यांची काही वैयक्तिक छायाचित्रे पोस्ट केली होती आणि दावा केला होता की त्यांनी ही फोटो तीन पुरुष आयएएस अधिकाऱ्यांना पाठवली आहेत. रूपा यांनी सिंधुरी यांच्यावर 19 आरोप केले आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी हे फोटो शेअर करण्यात आले. अखिल भारतीय सेवा नियमांनुसार, अशी छायाचित्रे शेअर करणे आणि असे संभाषण करणे हा गुन्हा आहे, याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी डी रुपा यांनी केली होती.
रोहिणी सिंधुरी यांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळले असून आपली बदनामी करण्यासाठी या गोष्टी केल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला. आपण डी रूपा यांच्याविरुद्ध सक्षम अधिकाऱ्याकडे तक्रार करणार आहेत, आणि त्यांच्याविरुद्ध सर्व कायदेशीर उपायांचा पाठपुरावा करणार आहे असंही त्या म्हणाल्या.
Karnataka DK Ravi Suicide Case: डीके रवी यांचा गूढ मृत्यू, एकतर्फी प्रेमप्रकरण असल्याचा संशय
कर्नाटकातील डीके रवी हे 2009 च्या बॅचचे आयएएस अधिकारी होते. यूपीएससीमध्ये डीके रवी हे देशातून 34 व्या क्रमांकाने पास झाले होते. रवी हे प्रामाणिक अधिकारी मानले जात होते. कोलार येथे कार्यरत असताना त्यांनी वाळू माफियांवर कारवाई केली. त्यानंतर त्यांची बंगळुरू येथे बदली झाली, जिथे त्यांनी वाणिज्य कर विभागाचे अतिरिक्त आयुक्त म्हणून काम केले.
16 मार्च 2015 डीके रवी हे त्यांच्या बंगळुरू अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळले. त्यांचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. प्राथमिकदृष्ट्या हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचे पोलिसांनी सांगितले. असे असले तरी रवी यांच्या मृत्यूनंतर मोठा गोंधळ झाला. कर्नाटकातील कोलार, मंड्या आणि तुमकुरू पट्ट्यांमध्येही मोठ्या प्रमाणात निदर्शने झाली. माफिया आणि बलाढ्य लॉबींशी पंगा घेतल्यामुळे दबावाखाली आलेल्या डीके रवी यांनी आत्महत्या केल्याची चर्चा रंगली.
विरोधकांच्या दबावानंतर तपास सीबीआयकडे?
सुरुवातीला डीके रवी यांचे प्रकरण कर्नाटक गुन्हे अन्वेषण विभाग हाताळत होते. पण रवी यांचे कुटुंब, मित्र आणि समर्थक यांच्या दबावामुळे आणि विरोधी पक्षांच्या मागणीनंतर तत्कालीन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी हे प्रकरण सीबीआयकडे सोपवले.
डीके रवी यांच्या मृत्यूनंतर एका आठवड्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले. दोन महिन्यानंतर या प्रकरणी सीबीआयने एक अहवाल दिला. त्यामध्ये म्हटलं होतं की, रवी हे एका रिअल इस्टेट व्यवहारात गुंतले होते. रवी आणि त्याच्या एका सहकाऱ्याने 50 एकर जमीन खरेदी करण्यासाठी पैसे घेतले होते जेणेकरून ते स्वतःचा रिअल इस्टेट व्यवसाय सुरू करू शकतील. मात्र ज्या जमिनीसाठी हा व्यवहार झाला त्याला मान्यता नसल्याने हा व्यवसाय सुरू झाला नाही. या फसलेल्या कराराचे पैसे परत न झाल्याने रवी यांनी आत्महत्या केल्याचे सीबीआयच्या अहवालात सांगण्यात आलं होतं.
मात्र 20 महिन्यांच्या तपासानंतर सीबीआयने तपासाचा अंतिम अहवाल सादर केला आणि त्या अहवालात रवी यांनी वैयक्तिक कारणामुळे स्वत:चा जीव घेतल्याचं आणि त्याच्यावर कोणताही बाह्य दबाव नसल्याचं म्हटलं आहे.
D Roopa Put 19 allegations against Rohini Sindhuri: डीके रवी यांच्या मृत्यूप्रकरणी रोहिणी सिंधुरी यांची भूमिका काय?
डीके रवी यांच्या हत्येचा तपास करताना एका व्यक्तीचा सातत्याने या यावेळी संदर्भ येत होता, ती व्यक्ती म्हणजे आयएएस अधिकारी रोहिणी सिंधुरी. रवी आणि एक महिला आयएएस अधिकारी यांच्यात प्रेमसंबंध असल्याचा धागाही जुळत होता. रवी यांनी एका महिला आयएएसला अनेक मेसेज पाठवल्याच्या बातम्या आल्या होत्या आणि ते एकतर्फी प्रेम प्रकरण होतं अशीही चर्चा होती. एकतर्फी प्रेमामुळे रवी आत्महत्या करण्यास हतबल झाल्याची बातमी सुरू झाली. या प्रकरणात रोहिणी सिंधुरी यांचं नाव आलं.
D Roopa Facebook Post: काय म्हणतात डी रुपा?
डी रुपा यांनी या संबंधी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्या म्हणतात की, दिवंगत आयएएस अधिकारी डीके रवी हे गृहस्थ होते. सीबीआयच्या अहवालात त्यांच्या चॅटचा उल्लेख आहे. गोष्टी नियंत्रणाबाहेर गेल्यावर सिंधुरी यांनी त्यांना ब्लॉक केलं असतं. त्यांना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देत राहिल्या.
कोरोना काळात चामराजनगरमध्ये ऑक्सिजनशिवाय 24 जणांचा मृत्यू झाल्याचा आरोप डी. रूपा यांनी केला आहे. आयएएस रोहिणी सिंधुरी यांच्यावर या प्रकरणी ठपका ठेवला. रूपा यांनी आरोप केला आहे की रोहिणी यांनी वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांना आक्षेपार्ह छायाचित्रे पाठवली.
Kusuma Hanumantharayappa Tweet: कर्माची फळं इथंच भोगावी लागतात, डीके रवी यांच्या पत्नींचं ट्वीट
डीके रवी यांच्या पत्नी कुसुमा हनुमंतरायप्पा (Kusuma Hanumantharayappa) यांनी या प्रकरणी एक ट्वीट केलं आहे. त्यामध्ये म्हटलंय की, जी पापं केली जातात त्याची फळं याच जन्मात भोगावी लागतात. थोडासा वेळ लागतो पण कर्माची फळं भोगावीच लागतात.
कुसुमा म्हणतात की, आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला सहन कराव्या लागलेल्या वेदना आणि अपमान इतर कोणीही सहन करू नये. किमान आता तरी रवी यांच्या आत्महत्येबाबत सीबीआयच्या क्लोजर रिपोर्टमधील मजकुरावर व्यापक चर्चा व्हायला. सीबीआयचा अहवाल समोर आल्यानंतर, अहवालात काय म्हटलं आहे यावर कोणीही चर्चा केली नाही. रवीच्या आत्महत्येचे कारण त्यात आहे, आणि त्याच्या आत्महत्येसाठी जबाबदार असलेल्यांची नावे देखील अहवालात नमूद केली आहेत.
डी रुपा यांनी कुसुमा यांचे ट्वीट रिट्वीट करत म्हटलंय की, एक स्त्री म्हणून मला तुझ्या वेदना समजतात. पण शेवटी कुणाला तरी गुन्हेगाराच्या विरोधात उभे राहावे लागते, मग ती स्त्री असली तरी. या प्रकरणी मी तुझ्या पाठीशी आहे. देव 'तिला' असं पुन्हा न करण्याची सुबुद्धी देवो.
डी रुपा आणि रोहिणी सिंधुरी यांच्या बदल्या तरी झाल्या, पण डी रुपा यांनी रोहिणी सिंधुरी यांच्यावर ठेवलेल्या 19 आरोपांची चौकशी होणार का? कर्नाटकातील महिला अधिकाऱ्यांमधील सुरू झालेला हा वाद आता कधी संपणार? डीके रवी यांच्या हत्येमागचं नेमकं कारण कधी समोर येणार? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं लवकर मिळावीत अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त केली जात आहे.
ही बातमी वाचा: