PM Modi Belgaon Visit : कर्नाटकात देखील आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांचे  वेगवेगळ्या निमित्ताने कर्नाटकात (Karnataka) अलीकडे वारंवार दौरे होत आहेत. आता 27 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्नाटक दौऱ्यावर येत आहेत.


रेल्वे स्थानक, विमानतळाचं उद्घाटन


या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बेळगाव (Belgaon) इथे कोट्यवधी रुपये खर्च करुन नुतनीकरण करण्यात आलेल्या रेल्वे स्थानकाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. पंतप्रधानांच्या बेळगाव दौऱ्याची तयारी जोरदार सुरु असून दुपारी 2:15 ते 3:30 या वेळेत ते बेळगावात असतील. सव्वा एक तासाच्या बेळगाव दौऱ्यात ते नुतनीकरण केलेल्या रेल्वे स्थानकाचे उद्घाटन करतील. इथे त्यांचा रोड शो होण्याचीही शक्यता आहे. त्यानंतर ते पीएम-किसान सन्मान निधीच्या पुढील टप्प्याचा शुभारंभ करतील, जो शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करेल. 


याशिवाय शेतकऱ्यांचा आणि भाजप कार्यकर्त्यांचा मोठा मेळावा आयोजित करण्यात आला असून मेळाव्याला लाखोंची उपस्थिती अपेक्षित असल्याचे भाजपच्या सूत्रांनी सांगितले. त्याचबरोबर शिमोगा येथील विमानतळाचे उद्घाटन देखील पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे.


पंतप्रधानांची प्रचारसभा होण्याची शक्यता


दुपारी 3.30 वाजता ते प्रचारसभेला संबोधित करण्याची शक्यता आहे. या सभेचं ठिकाण अद्याप ठरलेले नाही. परंतु सावगाव रोडवरील खुलं मैदान, सीपीईड मैदान, जिल्हा स्टेडियम किंवा बी.एस. येडियुरप्पा मार्ग यापैकी एका ठिकाणी त्यांची सभा होऊ शकते, असं पक्षाच्या नेत्यांचं म्हणणे आहे.


कर्नाटक विधानसभा पुन्हा काबीज करण्याचा मोदी-शाहांचा प्रयत्न 


महत्त्वाचं म्हणजे मागच्याच आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कर्नाटक दौरा केला होता. त्यावेळी ते बंगळुरु इथल्या एअरो शोला उपस्थित राहिले होते. मे महिन्यात कर्नाटकात विधानसभेची मुदत संपत असून विधानसभा निवडणुकांची तारीख निवडणूक आयोग लवकरच जाहीर करण्याची शक्यता आहे. त्यामुळे विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कर्नाटक दौऱ्यावर वारंवार येत आहेत. विधानसभा मतदारसंघाच्या दृष्टीने बंगळुरुनंतर बेळगाव हा सर्वात मोठा जिल्हा आहे. बेळगाव जिल्ह्यात 18 पैकी 13 जागा भाजपकडे आहेत. मुंबई महानगरपालिका निवडणूक डोळ्या समोर ठेऊन जसे पंतप्रधान मोदींच्या वारंवार मुंबई दौरे होत आहेत, त्या प्रमाणेच पुन्हा कर्नाटक विधानसभा काबीज करण्यासाठी पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांनी जोर लावला आहे.