मुंबई : दोन मुलांत भांडण असो वा दोन गटात, राग व्यक्त करण्यासाठी समोरच्याला थेट आई-बहिणीवरून शिवी हासडली जाते. अगदी बारीकसारीक काही घडलं तरी आपल्या तोंडातून आपसूक शिवी येते. आxx, चुXX, मादxxx, भेंxx, भोxxx किंवा रांxx... या शिव्या आपल्या आजूबाजूला सहजच ऐकू येतात, त्या आपल्या स्वभावाचाच एक भाग झालेत. वेब सीरीजमधे तर शिव्यांचा भडीमार केला जातो. पण या सगळ्या शिव्या ऐकाल तर एक लक्षात येते, सगळ्या शिव्या या महिलांवरून देण्यात येतात. त्यावरून आपल्या समाजव्यवस्थेचे रुप दिसते, आपली संस्कृती दिसते.


भारतीय संस्कृतीमध्ये महिलांना आदराचे स्थान दिले जाते, महिला-मुलींना लक्ष्मीचे रूप समजले जाते. त्यामुळेच आपल्या समाजात महिलांचा संबंध हा कुटुंबाच्या प्रतिष्ठेशी जोडला जातो. त्यात आपली पुरुषप्रधान संस्कृती. त्यामुळे सगळेच महिलांच्या प्रतिष्ठेप्रती अत्यंत संवेदनशील असल्याचं दिसून येतात. मग इतरांच्या प्रतिष्ठेला ठेच पोहोचवण्यासाठी महिलांच्या नावे शिवीगाळ केली जाते.


एखाद्याच्या सामाजिक प्रतिष्ठेला धक्का द्यायचा असेल किंवा त्याच्या सन्मानाला ठेच पोहोचवायची असेल तर कोणत्याही भांडणात त्याला आईवरुन किंवा बहिणीवरुन शिवी दिली जाते. 


कोणतीही भाषा ही त्या संस्कृतीची शक्ती असते, भाषा हे वर्चस्ववादाचं किंवा स्वातंत्र्याचं माध्यम असतं. आपली भाषा ही केवळ संवादाचं माध्यम नसून ते आपल्या संस्कृतीचं किंवा व्यक्तिमत्वाचं प्रतिबिंब असतं असे जगप्रसिद्ध लेखिका अँजेला कार्टर म्हणतात.


महिलांची कोंडी सुरू झाली


प्राचीन काळात महिलांना निर्णयप्रक्रियेत महत्त्वाचे स्थान होते याचे अनेक पुरावे सापडतात. नंतरच्या काळात पुरुषांचे वर्चस्व वाढले आणि महिलांची कोंडी करण्यास सुरूवात झाली. पाश्चात्य असो वा भारतीय संस्कृती किंवा अरबी समाजव्यवस्था, प्रत्येक ठिकाणी पुरुषसत्ताक संस्कृती उदयास आली. महिलांना फक्त भोगाचं माध्यम मानलं जाऊ लागलं. 


पूर्वीच्या काळी पराभूत राजा महाराजांच्या मुली उचलून नेल्या जायच्या, किंवा त्या विजयी राजाला द्याव्या लागायच्या. त्या भीतीतून राजपूतांच्या महिलांमध्ये 'जौहर'ची परंपरा आली. एखाद्याने आक्रमन केलंच तर या महिला विहिरीत सामूहिक आत्महत्या करायच्या. कमी अधिक तीव्रतेने तीच परंपरा कुठे ना कुठे सुरूच होती.


काळ बदलला पण मानसिकता तीच


काळ बदलला असं जरी आपण बोलत असलो तरी मानसिकता तीच आहे. वरवर महिलांच्या स्वातंत्र्याच्या गप्पा मारणारे आजही कोणत्या ना कोणत्या माध्यमातून पितृसत्ताक व्यवस्थेचं दर्शन घडवतात. त्यावरून विकास आणि मानसिकतेचा काही संबंध नसल्याचं स्पष्ट होतंय. 


एखाद्या महिलेच्या प्रतिष्ठेला धक्का द्यायचा असेल तर तिच्या चारित्र्यावर थेट हल्ला केला जातो. तिच्यावर काहीच बोलण्यासारखं नसल्यास तिला चारित्र्यहीन ठरवलं जातंय. एखादं ऑब्जेक्ट म्हणून महिलांकडे पाहण्याचा दृष्टीकोन यातून समोर येतोय.


वेब सीरीजमध्ये शिव्यांचा भडीमार


मध्यंतरी अभिनेता विजय राज आणि मनोज वाजपेयी यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत होता. त्यामध्ये ते त्यांच्या आवडत्या शिव्या सांगत असतात. शिव्या देण्यामध्येही लय असते, ती एक कविचात असते, तो आपल्या संस्कृतीचा भाग आहे असं ते सांगताना दिसतात. 


चित्रपटांमध्ये शिव्या देण्यावर सेन्सॉरशीप असली तरी ओटीटी प्लॅटफॉर्मवर मात्र त्याला कोणतंही बंधन असल्याचं दिसत नाही. त्यामुळेच कोणतीही वेब सीरीज पाहिली तर त्यामध्ये शिव्यांचा भडीमार केला जातो. त्याचा परिणाम म्हणजे, ती महिलांवरुन देण्यात येणाऱ्या शिव्या या आपल्या जीवनाचाच एक भाग असल्याचं ते पाहणाऱ्या लहान मुलांच्या मनावर नकळपणे बिंबताना दिसत आहे.


शिव्या या संस्कृतीचा भाग नव्हे, तो भेदभाव 


शिव्या देणे हा संस्कृतीचा किंवा रोजच्या जीवनाचा भाग नव्हे तर तो महिलांप्रती करण्यात येणारा भेदभाव आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे आपल्यावर अतिरिक्त तणाव निर्माण होत आहे हे नक्की. पण शिव्या दिल्यास काही प्रमाणात तो तणाव, फ्रस्ट्रेशन, राग दूर होऊ शकतो असं मानसोपचारांकडून सांगितलं जातं. 


कर्मचाऱ्यांना कामाचा ताण आला तर बॉसला त्याच्या आईवरून शिवी हासडली जाते. कॉलेजमधील विद्यार्थ्यांना शिक्षकांचा राग आल्यास त्या शिक्षकाची आई-बहीण काढली जाते. राजकारण्यांना जनतेचा राग आल्यास त्यांना आई-बहिणींवरून जाहीरपणे शिवीगाळ केली जाते. आपल्याकडे अगदी एखाद्यावर प्रेम जरी व्यक्त करायचं झालं तरी त्याला शिवी दिली जाते हेदेखील विशेष. 


केवळ आपल्या आई-बहिणीचा सन्मान करणे म्हणजे समानता नव्हे. केवळ महिला दिनी त्यांना सन्मान देणं म्हणजे समानतेचं धोरण अंगिकारणं असू शकत नाही. आपण महिलांच्या अधिकारांविषयी बोलत असून तर त्यांच्या प्रतिष्ठेला ठेच पोहोचवणाऱ्या या गोष्टींकडे लक्ष देणं आवश्यक आहे. 


महिलांचा आदर करणे, तो आपल्या चालण्या-बोलण्यातून व्यक्त करणं आणि सर्वात म्हणजे दुसऱ्यांना महिलांच्या संबंधित शिव्या न देणं हे देखील स्वत:च्या आई-बहीण किंवा पत्नी-मुलीचा सन्मान करण्यासारखं आहे. अनेकवेळा असे प्रसंग घडतात की त्यावेळी आपसूकच आपल्या तोंडात शिव्या येतात. पण त्या लिंगविरहित असतील, कोणाच्या आई- बहिणीच्या किंवा महिला वर्गाच्या सन्मानाला ठेच न पोहोचवणाऱ्या असतील तर अधिक बरं.


ही बातमी वाचा: