नवी दिल्ली : सरकारने वरिष्ठ वकील इंदू मल्होत्रा यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्याच्या कोलेजियमच्या शिफारशीला मंजुरी दिली आहे. यासंदर्भात लवकरच अध्यादेश जारी केलं जाईल. दरम्यान, इंदू मल्होत्रा उद्याच शपथ घेण्याची शक्यता आहे.

न्यायाधीश बनणाऱ्या सातव्या महिला
वकील ते थेट सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश बनणाऱ्या इंदू मल्होत्रा ह्या देशाच्या पहिल्या महिला वकील ठरल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश बनणाऱ्या इंदू मल्होत्रा या सातव्या महिला आहेत. 1989 मध्ये फातिमा बीबी या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश बनल्या. यानतंर सुजाता मनोहर, रुमा पाल, ज्ञान सुधा मिश्रा, रंजना देसाई आणि आर भानुमती ह्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश बनल्या होत्या.

सध्या सर्वोच्च न्यायालयाच्या 24 न्यायाधीशांमध्ये आर भानूमती ह्या एकच महिला न्यायाधीश आहे. आता 61 वर्षीय इंदू मल्होत्रा सुप्रीम कोर्टाच्या दुसऱ्या महिला न्यायाधीश असतील.

सुप्रीम कोर्टाच्या वरिष्ठ वकील बनणाऱ्या दुसऱ्या महिला
ऑगस्ट 2007 मध्ये इंदू मल्होत्रा यांची सर्वोच्च न्यायालयाच्या वरिष्ठ वकील म्हणून नेमणूक झाली होती. सुप्रीम कोर्टाच्या वरिष्ठ वकील म्हणून नियुक्त होणाऱ्या त्या दुसऱ्या महिला आहेत. तीन दशकांआधी म्हणजेच 1977 मध्ये लीला सेठ सर्वोच्च न्यायालयाच्या वरिष्ठ वकील बनल्या होत्या. तसंच हायकोर्टाच्या पहिल्या मुख्य न्यायाधीश बनण्याचा मानही त्यांना मिळाला होता.

जानेवारीतच इंदू मल्होत्रांच्या नावाची शिफारस
11 जानेवारी रोजी इंदू मल्होत्रा यांच्या नावाची शिफारस पाठवण्यात आली होती. ही शिफारस तीन महिन्यांपासून सरकारकडे प्रलंबित असल्याने न्यायाधीशांनी नाराजी व्यक्त केली होती. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश कुरियन जोसेफ यांनी सरन्यायाधीशांना यासंदर्भात पत्रही लिहिलं होतं.

कोण आहेत इंदू मल्होत्रा?
इंदू मल्होत्रा यांचा जन्म 1956 साली बंगळुरुमध्ये झाला. त्यांनी लेडी श्रीराम कॉलेज आणि दिल्ली विद्यापीठातून त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर मल्होत्रा यांनी राज्यशास्त्र विषयात पोस्ट ग्रॅज्युएशन केलं.

दिल्ली विद्यापीठाच्या मिरांडा हाऊस कॉलेज आणि विवेकानंद कॉलेजमध्ये त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केलं. 1983 मध्ये त्यांनी आपल्या वकिली कारकीर्दीची सुरुवात केली.

त्यांचं संपूर्ण कुटुंबच वकिली करतं. त्यांचे वडील ओपी मल्होत्रा वरिष्ठ वकील होते. त्यांचा मोठा भाऊ आणि बहिणही वकील आहे. त्याआधी त्यांनी दिल्ली विद्यापीठातून पदवी मिळवली. अनेक महत्त्वाच्या निकालात न्यायाधीशांच्या खंडपीठातही त्यांचा समावेश होता.

केएम जोसेफ यांच्याबद्दल अद्याप निर्णय नाही!
दुसरीकडे 11 जानेवारीलाच पाठवलेलं आणखी एक नाव केएम जोसेफ यांच्यावर सरकारने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.  केएम जोसेफ सध्या उत्तराखंड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आहेत.

कोलेजियमच्या शिफारशीची फाईल 22 जानेवारीला कायदे मंत्रालयात पोहोचली. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरु झालेल्या प्रक्रियेत केवळ इंदू मल्होत्रा यांचंच नाव पुढे सरकलं.

न्यायमूर्ती जोसेफ यांच्या नावाची शिफारस करताना, कोलेजियमने सेवाज्येष्ठता आणि स्थानिक प्रतिनिधित्वाकडे दुर्लक्ष केलं, असं सराकारचं मत आहे. 669 उच्च न्यायाधीशांच्या सेवाज्येष्ठतेच्या यादीत ते 42 स्थानावर आहेत.